विशेष प्रतिनिधी
बारामती : बारामती विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 16 ऑक्टोबर रोजी करण्याचे नियोजन असल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्यानंतर बारामतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, १६ ऑक्टोबर हा नवरात्रोत्सवातील कालावधी असून याच दिवशी मोदींच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्याचे नियोजन असल्याने या दौऱ्याला राजकीयदृष्ट्याही वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. Sharad Pawar
विद्या प्रतिष्ठानमध्ये गौतम बुद्धांचा पुतळा आणि विविध महापुरुषांच्या चित्रांनी सजलेले प्रेरणास्थळ उभारण्यात आले आहे. या वास्तूमध्ये राजर्षी शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सयाजीराव गायकवाड, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, यशवंतराव चव्हाण आणि शरदाबाई पवार यांना प्रेरणास्थान म्हणून स्थान देण्यात येणार आहे. या महापुरुषांचे कर्तृत्व, विचार आणि समाजासाठीचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. या वास्तूमध्ये गौतम बुद्धांचा पुतळा उभारण्यात आला असून, महापुरुषांची चित्रे नामांकित कलाकारांकडून तयार करून घेण्यात आली आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या स्थापना दिनानिमित्त १६ ऑक्टोबर रोजी या प्रेरणास्थळाचे उद्घाटन करण्याचा विचार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
नवरात्रात मोदी बारामतीत; राजकीय तर्कवितर्कांना उधाण….
दरम्यान, मागील काही काळापासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात एनडीएसोबत जाणार का, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा काही राजकीय समीकरण जुळणार का, याबाबत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सीजेपी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीनंतर या चर्चांना आणखी वेग आल्याचे चित्र होते.
मात्र, या चर्चांना शरद पवार यांनी यापूर्वीच पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता. मोदींसोबतची भेट ही सौजन्याची असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची अथवा सत्तेत सहभागी होण्याची शक्यता नाकारली होती.
असे असतानाच आता पवारांच्या अध्यक्षतेखालील विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी बारामतीत येण्याचे नियोजन, यामुळे या चर्चेला पुन्हा एकदा राजकीय रंग चढला आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे शैक्षणिक आणि सामाजिक स्वरूपाचा असला, तरी पवार आणि मोदी एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता असल्याने त्यातून कोणता राजकीय संदेश जातो, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
अहिल्यादेवींच्या कार्यातून बारव उभारण्याची संकल्पना….
प्रेरणास्थळाच्या माध्यमातून केवळ महापुरुषांची चित्रे प्रदर्शित करण्यापुरता हा उपक्रम मर्यादित राहणार नसून त्यांच्या कार्यातून समाजोपयोगी उपक्रमांची प्रेरणा घेण्याचाही विचार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी विविध ठिकाणी बारव, विहिरी आणि पाण्याची व्यवस्था केली. त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून जिरायती भागात बारव उभारण्याची संकल्पना असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. महापुरुषांच्या कार्याची माहिती अचूकपणे नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, यावरही पवार यांनी भर दिला. महिला कार्यकर्त्यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती वाचण्यासाठी देण्यात आली होती. त्यावेळी वाचन करताना झालेली एक चूक पवार यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे महापुरुषांचे कर्तृत्व आणि योगदान सांगताना संदर्भ व माहितीची अचूकता किती महत्त्वाची आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. प्रेरणास्थळाच्या निमित्ताने सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम आणि त्याचवेळी मोदींची संभाव्य बारामती भेट—या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबरचा दिवस बारामतीसाठी राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App