विशेष प्रतिनिधी
बारामती : दुष्काळाची अधिसूचना राज्य शासनाने काढल्यानंतर आता पुढील वर्षापर्यंत धरणांमधील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याबाबत शासन विचार करत आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करताना कोणतेही टप्पे केले जाणार नाहीत. जास्तीत जास्त मदत देण्याची शासनाची भूमिका आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील लाकडी येथे शनिवारी (ता. २६) कृषिमंत्री भरणे यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पिकांची स्थिती आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शासनाच्या उपाययोजनांची माहिती दिली. दुष्काळाची अधिसूचना निघाल्याने आता शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नियम व कायद्यांची चौकट असली तरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. केंद्र शासनाकडेही मदतीची मागणी करण्यात येणार असल्याचे भरणे म्हणाले. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी लवकरात लवकर कशा पद्धतीने करता येईल, याबाबत प्रयत्न सुरू आहेत. कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळाची परिस्थिती पाहता गरज भासल्यास चारा छावण्याही सुरू कराव्या लागतील, असे भरणे म्हणाले.
‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप
पाण्याचे नियोजन करण्याची गरज….
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील वर्षापर्यंत धरणांमधील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याबाबत शासन विचार करत आहे. त्यासाठी आगामी काळात पाण्याच्या वापराबाबत नियोजन करावे लागणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.
पवार साहेबांनी सूचना कराव्यात…
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरहून दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याबाबत विचारले असता भरणे म्हणाले, ‘‘आता दुष्काळाची अधिसूचना निघाली आहे. कोण काय करते यापेक्षा शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे महत्त्वाचे आहे. या परिस्थितीत राजकारण न करता सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. पवार साहेबांचा अनुभव मोठा आहे. त्यांनी आम्हाला सूचना कराव्यात.’’
नातू आजोबांना भेटू शकतात….
मुंबईतील सिल्व्हर ओक येथे पार्थ पवार, जय पवार, युगेंद्र पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याबाबत भरणे यांना विचारले असता त्यांनी ही कौटुंबिक भेट असण्याची शक्यता व्यक्त केली. या भेटीत सोमेश्वर कारखाना निवडणुकीबाबत चर्चा झाली का, याची माहिती नसल्याचे ते म्हणाले. ‘‘पार्थ, जय आणि युगेंद्र हे पवार साहेबांचे नातू आहेत. नातू आजोबांना भेटू शकतात. ही कौटुंबिक भेट असावी,’’ अशी प्रतिक्रिया भरणे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App