मुंबईचा विस्तार आता आणखी दोन शहरांपर्यंत! तिसरी-चौथी मुंबई उभारण्याची तयारी; फडणवीसांनी सांगितला १०० अब्ज डॉलरचा प्लॅन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात पुढील पाच वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट राज्य सरकारने निश्चित केले आहे. या माध्यमातून राज्यातील पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात येणार असून, तिसरी आणि चौथी मुंबई विकसित करण्याची योजनाही पुढे नेण्यात येत आहे. शहरीकरण ही समस्या नसून आर्थिक आणि सामाजिक विकासाची मोठी संधी आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये शहरांचा वाटा सुमारे ६५ टक्के असून, शहरे ही आर्थिक विकासाची इंजिने आहेत. त्यामुळे नियोजनबद्ध, शाश्वत आणि नागरिककेंद्रित शहरांच्या निर्मितीवर भर देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबई येथे आयोजित तिसऱ्या जागतिक महापौर परिषदेत (वर्ल्ड मेयर्स फोरम) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास राज्यमंत्री तोखन साहू, हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह, पश्चिम बंगालचे राज्यमंत्री उमेश राय, मुंबईच्या महापौर रितू तावडे, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण, महासंचालक जयराज पाठक, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य राजकिशोर मोदी यांच्यासह देश-विदेशातील महापौर, नगरप्रशासक, लोकप्रतिनिधी आणि शहरी विकास क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. third and fourth Mumbai

शहरीकरणाकडे समस्येऐवजी विकासाची संधी म्हणून पाहा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतात पूर्वी शहरीकरणाला समस्या मानून ते रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शहरीकरण रोखता आले नाही आणि त्याचे योग्य नियोजनही झाले नाही. परिणामी अनेक शहरांमध्ये अनियोजित विकास, झोपडपट्ट्या, अपुऱ्या नागरी सुविधा, पाणीटंचाई आणि कचरा व्यवस्थापनासारख्या समस्या निर्माण झाल्या. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ नंतर शहरीकरणाकडे विकासाची संधी म्हणून पाहण्याची भूमिका मांडली. त्यानंतर देशातील शहरी प्रशासन आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली.

शाश्वतता, सक्षम वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांसाठी राहण्यायोग्य शहरे हे शहरी विकासाचे तीन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. या तीनही बाबींचा समन्वय साधून शहरांचा विकास करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेशात ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक

मुंबई महानगर प्रदेशात गेल्या काही वर्षांत सुमारे ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. यामध्ये ३०० किलोमीटरपेक्षा अधिक मेट्रो नेटवर्क, रस्ते, उड्डाणपूल, बोगदे, पाणीपुरवठा योजना, सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि मूलभूत नागरी सुविधांच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाचा विकास करण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नवी मुंबई विमानतळ परिसरात तिसरी मुंबई विकसित होणार

महाराष्ट्राच्या भविष्यातील शहरी विकासाचे चित्र मांडताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईच्या निर्मितीचा महत्त्वाकांक्षी आराखडा स्पष्ट केला. नवी मुंबई विमानतळ परिसरात तिसरी मुंबई विकसित करण्यात येत असून, या भागात एज्यु-सिटी, स्पोर्ट्स सिटी, मेडि-सिटी, इनोव्हेशन सिटी आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर सिटी उभारण्यात येणार आहेत.

या माध्यमातून शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय सेवा, नवोपक्रम आणि जागतिक कंपन्यांच्या ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्ससाठी स्वतंत्र परिसंस्था निर्माण केली जाणार आहे. या परिसरात सुमारे एक लाख विद्यार्थ्यांची क्षमता असलेली शैक्षणिक व्यवस्था उभारण्याचे नियोजन आहे. तसेच १२ जागतिक दर्जाच्या विद्यापीठांचे कॅम्पस विकसित करण्यात येणार असून, त्यापैकी सात विद्यापीठांनी कामकाज सुरू केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

विरार ते वाढवण परिसरात चौथी मुंबई आकाराला येणार

तिसऱ्या मुंबईपाठोपाठ विरार ते वाढवण परिसरात चौथी मुंबई विकसित करण्यात येत आहे. वाढवण येथे देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक बंदर उभारण्यात येत असून, हे बंदर भविष्यात जगातील दहा मोठ्या बंदरांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

या परिसराला बुलेट ट्रेन आणि सुपर एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून मुंबईशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या भागात औद्योगिक, व्यावसायिक आणि नागरी विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रात पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.

अटल सेतूमुळे नवी मुंबई विमानतळाचा प्रवास अवघ्या ३० मिनिटांत!

मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानच्या कनेक्टिव्हिटीमध्ये अटल सेतू महत्त्वाची भूमिका बजावत आहे. २२ किलोमीटर लांबीच्या या सागरी सेतूमुळे मुंबईहून नवी मुंबई विमानतळ परिसरात पोहोचण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. सध्या हा प्रवास सुमारे ४० मिनिटांत पूर्ण करता येत असून, पुढील वर्षी हा कालावधी ३० मिनिटांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एकीकडे मुंबईसह राज्यातील विद्यमान शहरांचे पुनरुज्जीवन आणि पुनर्विकास, तर दुसरीकडे तिसरी व चौथी मुंबई यांसारख्या नव्या शहरांची निर्मिती, अशा दुहेरी धोरणातून महाराष्ट्राच्या नागरी विकासाला गती दिली जात आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख शहरांमध्ये मोठे परिवर्तन घडत असून, नियोजनबद्ध आणि शाश्वत शहरीकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला नवी उंची मिळवून देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Preparations underway to build a third and fourth Mumbai; Fadnavis unveils a $100 billion plan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात