विशेष प्रतिनिधी
सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी आंदोलनाला पक्षातूनच विरोध होत असल्याच्या चर्चांना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पूर्णविराम दिला आहे. सातारा येथे माध्यमांशी संवाद साधताना शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, रोहित पवारांच्या आंदोलनाला पक्षातून कोणताही विरोध नाही; मात्र त्यांनी पक्षाचा झेंडा आणि चिन्ह घेऊन एकत्र लढल्यास आंदोलनाची ताकद अधिक वाढेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. 26 तारखेच्या बैठकीला उपस्थित राहण्याच्या निरोपाचा कोणीतरी ‘ध चा मा’ केल्यामुळे मतभेदांच्या निराधार बातम्या पसरल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
चर्चेतून आणि पक्षाच्या चिन्हावर आंदोलन केल्यास सर्व नेते 100 टक्के सहभागी होतील: शशिकांत शिंदे
शशिकांत शिंदे यांनी नमूद केले की, यापूर्वी रोहित पवारांनी नाशिकसह जिथे-जिथे आंदोलने केली, तिथे स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पक्षाचे सर्व प्रमुख नेते सहभागी होऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. हा शरद पवारांचा पक्ष असून कोणताही निर्णय एकत्रित चर्चेतून झाला पाहिजे, असे सांगत शिंदे म्हणाले की, सध्याचा ट्रॅक्टर मोर्चा दुष्काळ आणि टँकरच्या प्रश्नावर असला तरी विदर्भ-मराठवाड्याचे इतर प्रश्नही एकत्र घेतल्यास आंदोलनाची तीव्रता अधिक वाढेल. रोहित पवारांनी शरद पवार आणि आमच्याशी चर्चा करून पक्षाचा झेंडा आणि चिन्ह घेऊन मोर्चा काढल्यास पक्षाचे सर्व नेते 100 टक्के त्यांच्यासोबत आंदोलनात उतरतील; मात्र चिन्हाशिवाय आंदोलन करण्याचा निर्णय त्यांचा वैयक्तिक असून स्वतंत्रपणे काम करण्याचे स्वातंत्र्य त्यांना असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
सरकारने चर्चेला बोलावले असेल तर नक्की जावे; बावनकुळेंच्या निमंत्रणावर शिंदे यांचा सल्ला
दरम्यान, राज्य सरकारकडून आंदोलनाबाबत चर्चेचे निमंत्रण आले असल्यास त्यावर सकारात्मक भूमिका घेण्याचा सल्लाही प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी रोहित पवारांना दिला आहे. समितीचे प्रमुख या नात्याने मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चेचे निमंत्रण दिले असेल तर सरकारशी चर्चा करायला हरकत नाही; रोहित पवारांनी बैठकीला जाऊन शेतकऱ्यांच्या मागण्या मांडाव्यात आणि जर सरकारकडून मागण्या पूर्ण होत असतील तर आंदोलनाचा फेरविचार करावा, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App