राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर सुनील तटकरे थेट फडणवीसांच्या भेटीला!

आधी सुनेत्रा पवारांसोबत दीड तास चर्चा, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट; राष्ट्रवादीतील राजकीय घडामोडींमुळे चर्चांना उधाण

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला असतानाच महत्त्वाच्या राजकीय भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या सलग भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.



अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे. अजित पवार गटातील काही आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.

सुनेत्रा पवारांसोबत दीड तास चर्चा

या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. या दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाल्याची माहिती आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

तटकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा निवासस्थानी भेट

सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर आज सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही भेट झाली. दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. सुनेत्रा पवार यांच्यासोबतची चर्चा आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी झालेली भेट यामुळे राष्ट्रवादीतील पुढील राजकीय भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे.

धनंजय मुंडेंनीही घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. दिवाळीनिमित्त त्यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीची माहिती देत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याची विनंती केल्याचे मुंडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

एकीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चा, तर दुसरीकडे नेत्यांच्या वाढत्या भेटीगाठी यामुळे राज्याच्या राजकारणात नेमक्या कोणत्या घडामोडी घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

After meeting Sunetra Pawar, Sunil Tatkare heads straight to meet Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात