विशेष प्रतिनिधी
पुणे: प्रशासकीय कामकाजातील कडक शिस्त, स्पष्टवक्तेपणा आणि धडाकेबाज कारवाईसाठी ओळखले जाणारे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा आपल्या रोखठोक विधानामुळे चर्चेत आले आहेत. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (FC College) मैदानावर आयोजित यूथ फेस्टिव्हलमध्ये तरुणांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांनी त्यांना थेट मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर मिश्किल पण स्पष्ट शब्दांत उत्तर देताना मुंढे म्हणाले की, मुख्यमंत्री होण्याची इच्छा ही केवळ ‘विश लिस्ट’चा भाग असू शकते; मात्र मी विश लिस्टमध्ये राहत नाही, तर वास्तवात जगतो. मी एक लोकसेवक असून केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता आपली जबाबदारी समजून प्रत्येक व्यक्तीचा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा जपणे, हीच माझ्या जीवनाची व्याख्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.Tukaram Mundhe
अन्न व औषधांचे तपासणी अहवाल आता अवघ्या 14 दिवसांत मिळणार
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यातील कामकाजाला गती देण्यासाठी उचललेल्या पावलांची माहितीही मुंढे यांनी दिली. पूर्वी अन्न आणि औषधांच्या नमुन्यांचे तपासणी अहवाल मिळण्यासाठी 30 दिवसांपासून ते सहा महिन्यांपर्यंतचा कालावधी लागत होता, ज्यामुळे दोषींवर कारवाई करण्यास मोठा विलंब होत असे. मात्र, गेल्या सहा महिन्यांत या प्रक्रियेत सुधारणा करून अहवाल मिळण्याचा कालावधी साधारण 20 दिवसांवर आणण्यात आला आहे. आगामी काळात आवश्यक मनुष्यबळ, साधनसामग्री आणि प्रयोगशाळांमध्ये शिफ्टनुसार कामकाज सुरू करून हा कालावधी 14 दिवसांपर्यंत खाली आणण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.Tukaram Mundhe
जिममध्ये प्रोटीन विकणारे आणि दिशाभूल करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सवर कारवाईचा बडगा
सध्या बाजारात हेल्थ सप्लिमेंट आणि प्रोटीन उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये ‘स्नायू वाढतील किंवा मसल्स गेन होतील’ असे बेकायदेशीर आणि दिशाभूल करणारे दावे केले जात असल्याबद्दल तुकाराम मुंढे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. जिम चालकांना कोणत्याही प्रकारची सप्लिमेंट्स किंवा प्रोटीन पावडर विकण्याचा आपोआप अधिकार मिळत नाही; त्यासाठी रीतसर परवाने घेणे बंधनकारक आहे. केवळ एफएसएसएआयचा (FSSAI) परवाना असला तरी विक्री केले जाणारे उत्पादन, त्याचे लेबल आणि ब्रँड नियमांनुसार योग्य आहेत की नाही, याची खातरजमा करणे विक्रेत्यांची जबाबदारी आहे. चुकीचा ब्रँड किंवा दिशाभूल करणारे दावे आढळल्यास उत्पादक आणि विक्रेत्यांसोबतच अशा उत्पादनांची जाहिरात करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनाही कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवले जाणार नाही आणि सर्वांवर समान कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुंढे यांनी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App