विशेष प्रतिनिधी
पुणे :राज्यातील वाढती दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांना मिळणारी केंद्राची मदत, बारामती विमानतळाचा विकास आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातावरून सुरू असलेले राजकारण या सर्वच महत्त्वाच्या मुद्द्यांवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज आपली सविस्तर भूमिका मांडली. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना भरणे म्हणाले की, अजितदादांच्या अपघाताच्या चौकशीला उशीर होत असल्याने लोकांमध्ये गैरसमज आणि संभ्रम वाढत आहे; त्यामुळे या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण होऊन 100 टक्के सत्य समोर आले पाहिजे. यासोबतच आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या ‘मफलर मॅन’च्या आरोपांवरही त्यांनी स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले.Dattatray Bharne
फोटो काढला किंवा लग्नात मफलर दिला म्हणजे वेगळा अर्थ होत नाही: भरणे
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत बोलताना दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, अजितदादांचा एक जवळचा कार्यकर्ता म्हणून या अपघातामागील संपूर्ण सत्य बाहेर आलेच पाहिजे, असे मला मनापासून वाटते. पुण्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना तपास लवकर पूर्ण करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी फडणवीस यांचा फोटो दाखवत केलेल्या ‘मफलर मॅन’च्या आरोपावर फडणवीसांची पाठराखण करताना भरणे म्हणाले की, कोणासोबत फोटो काढला किंवा कोणी लग्नात मफलर गिफ्ट दिला म्हणजे त्याचा काहीतरी वेगळा अर्थ होत नाही; अजितदादा आणि फडणवीस यांचे नाते मी जवळून पाहिले आहे, त्यामुळे कोणीही विनाकारण वक्तव्ये न करता तपासातून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होऊ द्यावे.
310 तालुक्यांत दुष्काळ; वंचित 10 लाख शेतकऱ्यांना लवकरच 5 हजार रुपये मिळणार
राज्यातील दुष्काळी स्थितीवर माहिती देताना कृषिमंत्री म्हणाले की, पूर्वी 304 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला होता, त्यात आता 6 तालुक्यांची भर पडून एकूण 310 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून पंचनाम्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. एनडीआरएफच्या (NDRF) मदतीच्या हेक्टरी दरात वाढ झाल्याने आता नव्या दराने फेरप्रस्ताव केंद्राकडे पाठवावा लागेल; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याने केंद्राकडून लवकरात लवकर भरीव मदत मिळेल. दिवाळीपूर्वी सुमारे 95 लाख ते 1 कोटी शेतकऱ्यांना ₹5,000 ची अग्रिम मदत देण्यात आली असून, ई-केवायसी आणि सामाईक जमिनीच्या कागदपत्रांमुळे वंचित राहिलेल्या सुमारे 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरही लवकरच ही रक्कम जमा केली जाईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले.
बारामती विमानतळासाठी 132 कोटी मंजूर; मतदार यादीतून पात्र नावे वगळू नयेत
बारामती विमानतळाच्या सुरक्षिततेच्या आणि धावपट्टी दुरुस्तीच्या मुद्द्यावर बोलताना भरणे यांनी सांगितले की, या विमानतळाच्या विकासासाठी अजितदादा, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मोठा पाठपुरावा केला होता आणि दादांनी स्वतः त्याचे एस्टिमेट सादर केले होते; आता राज्य सरकारने या कामासाठी ₹132 कोटींच्या निधीला मान्यता दिली असून हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा आहे. याशिवाय, मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून विरोधकांनी केलेल्या आरोपांवर बोलताना, केवळ मृत व्यक्ती किंवा लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलींचीच नावे यादीतून कमी व्हावीत; नोकरीनिमित्त पुणे-मुंबईत राहणाऱ्या पण गावात घर, शेती आणि रेशन कार्ड असलेल्या मतदारांची नावे विनाकारण वगळली जाऊ नयेत, हीच महायुती सरकारची पारदर्शक भूमिका असल्याचे दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App