विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: फिक्कीच्या (FICCI) 100 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील बड्या उद्योगपतींना स्पष्ट शब्दांत फटकारले. या कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर संबोधित करताना पंतप्रधानांनी कंपन्यांच्या नफेखोरीच्या वृत्तीवर आणि रोजगारनिर्मितीतील उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तुमची भूक इतकी वाढली आहे की कितीही खाऊ घातले तरी पोट भरत नाही; सरकारने करसवलती दिल्यानंतरही कंपन्यांनी ना कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले, ना नवीन नोकऱ्या दिल्या, अशा थेट शब्दांत मोदींनी उद्योगजगताचे कान टोचले.
करसवलत आणि नफा वाढूनही कर्मचाऱ्यांच्या कमाईत घट झाल्याची आकडेवारी
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सरकारने कॉर्पोरेट कर 30 टक्क्यांवरून कमी करून 22 टक्के केला आणि ₹12 लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त केले; मात्र त्यानंतरही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन किंवा त्यांची संख्या वाढवली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कंपन्यांचा दृष्टिकोन केवळ ‘मोदीजी, तुम्ही करा आणि आम्ही फक्त पाहत राहू’ असाच राहणार आहे का, असेही त्यांनी विचारले. या संदर्भातील विविध अहवालांच्या आकडेवारीनुसार, कंपन्यांचा नफा वेगाने वाढला असला तरी कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि रोजगारात त्या प्रमाणात वाढ झालेली नाही:
एसबीआयच्या (SBI) आकडेवारीनुसार, 2023-24 मध्ये कंपन्यांचा नफा 22.3 टक्क्यांनी वाढला, तर कर्मचाऱ्यांच्या संख्येत केवळ 1.5 टक्के वाढ नोंदवली गेली.
मोतीलाल ओसवाल यांच्या अहवालानुसार, 2020-21 ते 2025-26 दरम्यान निफ्टी-500 कंपन्यांची कमाई दरवर्षी सरासरी 28.7 टक्क्यांनी वाढली आहे.
दुसरीकडे, 2024-25 च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, महागाईचा विचार करता 2017-18 ते 2023-24 दरम्यान पुरुषांची प्रत्यक्ष कमाई 6.4 टक्क्यांनी आणि महिलांची कमाई 12.5 टक्क्यांनी घटली आहे.
गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘माझे ऐकू नका, किमान गांधीजींचे तरी ऐका’; स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा संदेश
उद्योगजगताला स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचे महत्त्व पटवून देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, महात्मा गांधीजींनी शंभर वर्षांपूर्वीच स्वदेशी स्वीकारण्याचा संदेश दिला होता, तरीही आज एक शतक उलटून गेल्यानंतर मला पुन्हा तीच गोष्ट उद्योगपतींना सांगावी लागत आहे; हे तुमचे यश आहे की अपयश, याचा विचार करा. माझे म्हणणे मानू नका, पण किमान गांधीजींचे तरी ऐका, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. विकसित भारताचे उद्दिष्ट ही केवळ घोषणा नसून एक संकल्प आहे; त्यामुळे 100 वर्षे वाट पाहण्याऐवजी पुढील 10 वर्षांत आपण देशाच्या विकासासाठी काय योगदान देऊ शकतो, याचा विचार उद्योजकांनी करावा, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
सुधारणांच्या माध्यमातून सरकार व्यावसायिकांच्या पाठीशी उभे राहणार
1927 मध्ये स्थापन झालेली फिक्की ही देशातील मोठी व्यावसायिक संघटना सरकार आणि उद्योगजगत यांच्यात दुवा म्हणून काम करते. या व्यासपीठावरून पंतप्रधानांनी आश्वस्त केले की, सरकार ‘रिफॉर्म एक्सप्रेस’च्या माध्यमातून सातत्याने धोरणात्मक सुधारणा करत आहे. व्यावसायिकांनी कोणत्याही संकोचाशिवाय आपल्या समस्या आणि सुधारणांशी संबंधित सूचना सरकारकडे मांडाव्यात, सरकार त्यावर नक्कीच काम करेल आणि उद्योगजगताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App