विशेष प्रतिनिधी
बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच भाऊबीज. दरवर्षी भाऊबीजेच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पवार कुटुंबातील बहिणींना यंदा मात्र हा सण अजितदादां शिवाय साजरा करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत समाजमाध्यमांवर भावनिक पोस्ट केली आहे. दादा, आम्हा सगळ्या बहिणींना तुझी किती आठवण येतेय, हे शब्दांत सांगणंही कठीण आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवार यांच्यासोबतच्या भाऊबीजेच्या आठवणी जागवल्या आहेत. दरवर्षी या दिवसाची आम्हा सगळ्या बहिणींना किती ओढ असायची! यंदा मात्र भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि आपल्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली, असे त्यांनी म्हटले आहे. आपले एकत्र येणे, गप्पा, हसणे आणि बहिणींच्या घोळक्यात रमून गेलेला दादा आजही डोळ्यांसमोर उभा राहतो.
त्यावेळी अगदी सहज वाटणारे ते क्षण आज किती मोलाचे होते, याची जाणीव होते. आजच्या दिवशी तुझे नसणे मनाला चटका लावून जाते. आम्हा सगळ्या बहिणींना तुझी किती आठवण येतेय, हे शब्दांत सांगणेही कठीण आहे. तू आमच्या मनात कायम आहेस आणि कायम राहशील, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजितदादांच्या निधनानंतरची पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच बारामतीकरांसाठी अत्यंत हळवी ठरली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App