शिंदे गटाने फाडल्या सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती! सावरकरांच्या कथित अपमानावरून आक्रमक पवित्रा, उद्धव ठाकरेंनाही थेट सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचा अवमानजनक उल्लेख करण्यात आल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी मुंबईत आयोजित केलेल्या विशेष पत्रकार परिषदेत शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय निरुपम, शायना एन. सी. आणि महिला नेत्यांनी कॅमेऱ्यांसमोरच या पुस्तकाची आक्षेपार्ह पाने फाडून तीव्र निषेध नोंदवला. या वेळी बोलताना शिवसेना नेत्यांनी सावरकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलेल्या उद्धव ठाकरेंना हा अपमान मान्य आहे का, असा थेट सवाल उपस्थित केला. 16 नोव्हेंबर रोजी दिल्लीत या 544 पानांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले असून त्यातील काही संदर्भांवरून आता महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे.

पुस्तकातील पान क्रमांक 201 आणि 443 वरील वादग्रस्त मजकूर

पत्रकार परिषदेत शिवसेना नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील आक्षेपार्ह मजकूर वाचून दाखवत काँग्रेसच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. शिवसेनेच्या दाव्यानुसार, या पुस्तकातील पान क्रमांक 201 वर असे नमूद करण्यात आले आहे की, काँग्रेसचे स्वातंत्र्यसैनिक ब्रिटिश सत्तेचा अत्याचार आणि तुरुंगवास सहन करत असताना विनायक दामोदर सावरकर ब्रिटिश शासकांकडे दयायाचना अर्थात माफीची पत्रे पाठवत होते, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही सदस्य ब्रिटिशांचे खबरी म्हणून काम करत होते. याशिवाय, पान क्रमांक 443 वर सावरकरांचा उल्लेख ‘हिंदुत्व’ विचारसरणीचे जनक असा करत त्यांनी भारताकडे प्रामुख्याने ‘जिथे हिंदू सर्वोच्च आहेत’ (हिंदू वर्चस्ववादी) अशा दृष्टिकोनातून पाहिले आणि हीच भूमिका संघ परिवार व भाजप पुढे नेत असल्याचे लिहिले आहे. हा निव्वळ खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे.

पुस्तकावर बंदी आणि सोनिया गांधींच्या माफीसह शिवसेनेच्या 4 प्रमुख मागण्या

स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचा अवमान सहन केला जाणार नाही, असे ठणकावत शिवसेनेने चार प्रमुख मागण्या पुढे केल्या आहेत.

चुकीचा इतिहास मांडून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या पुस्तकावर महाराष्ट्र सरकारने तात्काळ बंदी घालावी.

या पुस्तकाचे प्रकाशक ‘हार्पर कॉलिन्स’ (HarperCollins) यांना अधिकृत पत्र पाठवून पान क्रमांक 201 आणि 443 तातडीने वगळण्याची मागणी केली जाणार आहे.

जोपर्यंत पुस्तकातून हा आक्षेपार्ह मजकूर हटवला जात नाही, तोपर्यंत सर्व ऑनलाइन पोर्टल्स आणि विक्री केंद्रांवरून या पुस्तकाची विक्री थांबवण्यात यावी.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कोट्यवधी हिंदुत्ववादी नागरिकांचा अपमान केल्याबद्दल सोनिया गांधी यांनी संपूर्ण देशाची जाहीर माफी मागावी.

बाळासाहेब ठाकरेंच्या आंदोलनाची आठवण करून देत उद्धव ठाकरेंवर टीका

या पत्रकार परिषदेत शिवसेना नेत्यांनी 2003 आणि 2004 मधील घटनांचा संदर्भ देत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर निशाणा साधला. 2003 मध्ये संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सावरकरांचे तैलचित्र लावण्यात आले, तेव्हा सोनिया गांधींनी त्यावर बहिष्कार टाकून तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना पत्र लिहून विरोध केला होता. तसेच, 2004 मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी अंदमानच्या सेल्युलर जेलमधील सावरकरांची नामफलक पाटी हटवण्याची भाषा केली होती, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर आंदोलन करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते. आज ज्या सावरकरांनी 11 वर्षे काळ्या पाण्याच्या तुरुंगात अमानुष यातना सहन केल्या, त्यांचा अपमान करणाऱ्यांचे पुस्तक उद्धव ठाकरे स्वीकारतात, हे अत्यंत लाजिरवाणे असल्याचे नेत्यांनी म्हटले. तसेच, 1984 पर्यंत भारताचे नागरिकत्व न स्वीकारलेल्या सोनिया गांधींनी सावरकरांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये आणि पुस्तकात 1984 ची शीखविरोधी दंगल, 2 जी व कोळसा घोटाळा, बोफोर्स तसेच 26/11 च्या हल्ल्यावर का लिहिले नाही, असा सवालही प्रवक्त्यांनी विचारला.


गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


आंध्र प्रदेश आणि तेलंगणातूनही पुस्तकावर नाराजी; वायएसआर काँग्रेस आणि बीआरएसचे आक्षेप

केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर दक्षिण भारतातील प्रादेशिक पक्षांनीही सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर आक्षेप घेतला आहे. वायएसआर काँग्रेसचे खासदार मड्डिला गुरुमूर्ती यांनी विचारले की, ज्या वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी पदयात्रेच्या माध्यमातून आंध्र प्रदेशात काँग्रेसला बळकट केले आणि 2004 व 2009 मध्ये केंद्रात यूपीए सरकार आणण्यात मोठा वाटा उचलला, त्यांच्या योगदानाचा साधा उल्लेखही पुस्तकात का नाही. दुसरीकडे, भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामा राव यांनी आरोप केला की, सोनिया गांधी यांच्या मनात तेलंगणासाठी कोणतीही जागा नसल्यानेच पुस्तकात तेलंगणाचा साधा उल्लेखही केलेला नाही.

पुस्तकाची पार्श्वभूमी आणि सोनिया गांधींनी मांडलेले प्रमुख मुद्दे

दरम्यान, या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर सोनिया गांधी यांनी सांगितले की, मी अंतर्मुख स्वभावाची असल्याने सुरुवातीला पुस्तक लिहिण्याचे टाळले होते; मात्र राहुल, प्रियंका आणि मैत्रीण मंजुलिका दुबे यांच्या आग्रहामुळे हे 7 प्रकरणांचे आणि 544 पानांचे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी 1965 मधील केंब्रिज येथील राजीव गांधींशी झालेली पहिली भेट, 1968 मधील विवाह आणि भारतातील आगमन, सासू इंदिरा गांधींसोबतचे आईसारखे नाते, 1975 च्या आणीबाणीची चूक आणि त्यावरील राजीव गांधींचे मतभेद, 1984 चे ऑपरेशन ब्लू स्टार, इंदिरा व राजीव गांधींच्या हत्येनंतरचे संकट, 1998 मधील राजकारणातील प्रवेश आणि 2004 मध्ये मुलांच्या सुरक्षेच्या चिंतेपोटी पंतप्रधानपद नाकारण्याचा निर्णय यांसारख्या आठ प्रमुख घडामोडींवर आपले अनुभव मांडले आहेत.

Shinde group tore up copies of Sonia Gandhi’s book

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात