विशेष प्रतिनिधी
रायगड: उरण विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश बालदी यांना 2010 मधील मारहाणीच्या एका जुन्या प्रकरणात अलिबाग न्यायालयाने 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात आमदार बालदी यांच्यासह इतर तीन जणांनाही दोषी ठरवण्यात आले असून, चौघांनाही ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तब्बल 16 वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल लागल्याने रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाने चारही दोषींना तात्काळ जामीन मंजूर केला असून या निकालाविरोधात जिल्हा न्यायालयात अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे.
मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारताना तरुणाला मारहाण केल्याचे प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 2010 मध्ये रायगड जिल्ह्यातील उरण येथे घडली होती. परिसरातील एका मुलीची छेडछाड केल्याचा आरोप एका तरुणावर होता. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर संबंधित तरुणाला जाब विचारण्यासाठी महेश बालदी आणि त्यांचे काही सहकारी गेले होते. या वेळी झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संबंधित तरुणाला शिवीगाळ करत गंभीर मारहाण करण्यात आल्याचा आरोप होता. या घटनेत तो तरुण गंभीर जखमी झाला होता, ज्यानंतर या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुराव्यांच्या आधारे चौघे दोषी; आता जिल्हा न्यायालयात अपीलाकडे लक्ष
गेली 16 वर्षे अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती. न्यायालयाने सादर झालेले पुरावे आणि युक्तिवादाच्या आधारे आमदार महेश बालदी यांच्यासह चार जणांना दोषी ठरवत प्रत्येकी 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. विद्यमान आमदाराला न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे या निकालाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या चारही आरोपींना जामीन मंजूर झाला असून, एका महिन्याच्या मुदतीत ते या निकालाला जिल्हा न्यायालयात आव्हान देणार का आणि पुढे काय न्यायालयीन घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App