पाणी व चारा टंचाई, रोजगाराबाबत शेतकऱ्यांशी संवाद
लातूर : राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथे केळीच्या बागेची, तसेच नायगाव येथे व्हीबी-जी रामजी योजनेंतर्गत सुरू असलेल्या पाणंद रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी आणि मजुरांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच शेतीचे नुकसान, पाणीटंचाई, चारा आणि रोजगार यांविषयी माहिती घेतली.
याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आदी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते जलतारा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
नायगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना राज्यपाल म्हणाले की, यावर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणे हे आपले कर्तव्य आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन विविध माध्यमांतून शेतकऱ्यांना मदत करत आहे, ही समाधानकारक बाब आहे. व्हीबी-जी रामजी योजनेतून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्य शासनाने हाती घेतलेल्या नदीजोड प्रकल्पामुळे भविष्यात पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास मदत होणार आहे. शासन, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न केल्यास दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दुष्काळाच्या या संकटात सरकार सर्व पातळ्यांवर काम करत असून, दुष्काळ निवारणासाठी करण्यात येत असलेल्या तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये नागरिकांनीही सहभागी व्हावे. सरकार आणि समाजाने एकजुटीने काम केल्यास या संकटावर मात करून त्यातून बाहेर पडण्यास मदत होईल. या संकटकाळात आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशा शब्दांत राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
लातूर जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन होते. मात्र, यंदा अपुऱ्या पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या संकटकाळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, त्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी आणि पीक विम्याची भरपाई मिळावी, यासाठी पावले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र व राज्य शासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे, असे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधील गाळ उपसून जलसाठा वाढविण्यासह भूजल पुनर्भरणासाठीही प्रयत्न सुरू आहेत. दुष्काळाच्या संकटाचा सामना सर्वांनी मिळून करूया. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कितीही संकटे आली तरी खचून न जाता लढण्याची शिकवण दिली आहे. ही शिकवण लक्षात ठेवून या संकटाचा एकजुटीने सामना करूया. एकमेकांना मदत करून या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासन आपल्या सोबत आहे, अशी ग्वाही पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
दुष्काळाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी राज्यपाल स्वतः चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर आले, याबद्दल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले. यंदाचा दुष्काळ अधिक भीषण स्वरूपाचा असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस पावले उचलली आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आले आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही लवकरच प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देण्याचे निर्देश बँकांना दिले असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
यंदा पाण्याची तीव्र टंचाई असून, चारा टंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. पशुपालकांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच अवैध सावकारीविरोधात कठोर पावले उचलली जात असल्याचे सहकार मंत्र्यांनी यावेळी सांगितले.
लाभार्थ्यांना विविध योजनांच्या मंजुरी आदेशांचे वितरण
यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेश, प्रमाणपत्रे आणि प्रत्यक्ष लाभांचे वितरण करण्यात आले. यामध्ये व्हीबी-जी रामजी योजनेंतर्गत लाभ, चारा लागवडीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून बियाण्यांचे वाटप, ट्रॅक्टर व कडबा कुट्टी यंत्रांचे वितरण, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेची मंजुरीपत्रे तसेच अवैध सावकारीच्या कब्जातून मुक्त झालेल्या जमिनीचा सातबारा उतारा सुपूर्द करण्यात आला.
रोहयो मजुरांची आस्थेवाईकपणे विचारपूस
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नायगाव येथे व्हीबी-जी रामजी योजनेंतर्गत सुरू असलेल्या पाणंद रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथे काम करणाऱ्या मजुरांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच जिल्ह्यात व्हीबी-जी रामजी योजनेंतर्गत रोजगार हमीची किती कामे सुरू आहेत आणि कोणत्या कामांना प्राधान्य दिले जात आहे, याबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App