विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य विधिमंडळाचे आगामी हिवाळी अधिवेशन अवघ्या दोन आठवड्यांचे घेण्याच्या सरकारच्या नियोजनावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मुनगंटीवार यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवून तो किमान तीन ते चार आठवड्यांचा करावा, अशी आग्रही मागणी केली. अधिवेशनाचा कालावधी मर्यादित ठेवल्यास सरकार जनतेच्या प्रश्नांबाबत गंभीर नसल्याचा आणि आपले सरकार इंग्रजांपेक्षाही वाईट असल्याचा संदेश जनतेमध्ये जाऊ शकतो, असे स्पष्ट मत मांडत त्यांनी स्वपक्षीय सरकारलाच घरचा अहेर दिला आहे. त्यांच्या या परखड भूमिकेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. Sudhir Mungantiwar
विदर्भाचे प्रश्न आणि सावरकरांना भारतरत्न देण्याच्या प्रस्तावासाठी अधिक वेळेची मागणी
नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला विदर्भातील प्रश्नांच्या दृष्टीने विशेष महत्त्व असते. या अधिवेशनात विदर्भातील शेतकरी, सिंचन, शेतीमालाचे दर, रोजगार आणि स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित असते. मात्र, केवळ दोन आठवड्यांच्या कालावधीत विदर्भासह राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांना पुरेसा न्याय मिळणार नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. यासोबतच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारा प्रस्ताव याच अधिवेशनात मंजूर करून घेण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध करून द्यावा आणि त्यासाठी अधिवेशन तीन किंवा चार आठवड्यांचे घ्यावे, अशी भूमिका त्यांनी बैठकीत मांडली.
गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7 डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात; कामकाज वाढल्यास मुदतवाढीचा विचार
विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू करण्यास आणि सुरुवातीला दोन आठवड्यांचे कामकाज निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुनगंटीवार यांच्या मागणीला तात्काळ मंजुरी मिळाली नसली, तरी अधिवेशनादरम्यान कामकाजाचा व्याप वाढल्यास किंवा अधिक दिवसांची आवश्यकता भासल्यास कालावधी वाढवण्यासाठी पुन्हा समितीची बैठक घेण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. दुसरीकडे, राज्य सरकारकडून अद्याप विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनस जाहीर करण्यात आलेला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, वाढलेला उत्पादन खर्च आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सरकारने तातडीने धानाला बोनस जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडण्याच्या घटनेवर संयमित भूमिका
दरम्यान, शिंदे गटाच्या आमदार शायना एनसी यांच्याकडून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडण्यात आल्याच्या घटनेवरही सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. भावनिक अवस्थेत असताना काही वेळा माणसाच्या हातून गंभीर कृती घडू शकतात, असे सांगत त्यांनी यापूर्वी काँग्रेसच्या हातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्याची घटनाही घडल्याचा संदर्भ दिला. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो जाणीवपूर्वक फाडण्यात आला नसून ती अजाणतेपणी झालेली चूक असू शकते, अशी संयमित भूमिका मुनगंटीवार यांनी या प्रकरणावर मांडली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App