विशेष प्रतिनिधी
मुंबई: दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आमदार रोहित पवार यांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. रोहित पवार यांनी स्वतःच पत्रकार परिषदेत सांगितले की ही पक्षाची पत्रकार परिषद नसून त्यांचे वैयक्तिक मत आहे; सशक्त लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असतो, मग त्यांनी स्वतःच स्पष्ट केले असताना तुम्ही पक्षाला का वेठीस धरता, असा थेट सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना विचारला. यासोबतच त्यांनी शेतकरी कर्जमाफी, रखडलेली आर्थिक मदत, एसआरए घोटाळा, डिलिमिटेशन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींवर सविस्तर भाष्य केले.
मी पॉलिसी मेकर आहे, विमान वाहतूक तज्ज्ञ नाही; चौकशी अहवालाची वाट पाहूया
रोहित पवार पक्षाच्या आत एकटे पडले आहेत का आणि फडणवीसांवरील आरोपांशी आपण सहमत आहात का, या प्रश्नांना उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी एक लोकप्रतिनिधी आणि पॉलिसी मेकर आहे, पण नागरी उड्डाण क्षेत्रातील तांत्रिक तज्ज्ञ नाही; त्यामुळे तांत्रिक बाबींवर भाष्य करण्यासाठी मी सक्षम अधिकारी नसून याबाबत तज्ज्ञांशी चर्चा झाली तर जनतेला अधिक स्पष्ट उत्तरे मिळतील. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या गृहमंत्र्यांकडे या अपघाताच्या चौकशीची मागणी केली असल्यामुळे आता आपण त्या अधिकृत तपास अहवालाची वाट पाहूया, असे मत त्यांनी मांडले.
गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
70 हजार कोटींच्या कर्जमाफीचा दाखला देत सरसकट कर्जमाफी आणि मदतीची मागणी
नांदेड जिल्ह्यात कर्जवसुलीच्या तगाद्याला कंटाळून एका शेतकऱ्याने जीवन संपवल्याच्या घटनेवर दुःख व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली. दुष्काळात वसुलीसाठी कोणीही शेतकऱ्याच्या दारात जाणार नाही असे आश्वासन सरकारने दिले होते, मग तरीही वसुली का सुरू आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान आणि शरद पवार कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांचे ₹70,000 कोटी कर्ज माफ केले होते, त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सरसकट कर्जमाफी करावी आणि हेक्टरी ₹1 लाख मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, हवेली, भोर, वेल्हा, मुळशी आणि खडकवासला तालुक्यांतील वंचित शेतकऱ्यांना ₹5,000 ची मदत मिळावी यासाठी आमचे कार्यकर्ते दररोज यादी तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील, असे सुळे यांनी सांगितले. कोल्हापूरप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि धाराशिवमधील उसालाही ₹4,200 दर मिळावा असे सांगतानाच, दुष्काळी जिल्ह्यांतील जलसंधारणासाठी मंजूर केलेल्या ₹400 कोटींच्या निधीचे त्यांनी स्वागत केले.
एसआरए घोटाळ्याची चौकशी, डिलिमिटेशनवरील भूमिका आणि ठाकरे कुटुंबाशी ऋणानुबंध
खासदार संजय राऊत यांनी एसआरएच्या (SRA) 33(11) योजनेतील सुमारे ₹20,000 कोटींच्या कथित घोटाळ्याबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचे समर्थन करत, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या पत्रांनाही एसआरएकडून केराची टोपली दाखवली जात असल्याची चिंता सुळे यांनी व्यक्त केली. मतदारसंघ पुनर्रचनेच्या (डिलिमिटेशन) मुद्द्यावर पक्षाची भूमिका कायम असल्याचे स्पष्ट करत, वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांचे मत पक्षासाठी नेहमीच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या मुद्द्यावर बोलताना सुळे म्हणाल्या की, पवार आणि ठाकरे कुटुंबाचे संबंध 5 ते 7 दशकांचे आहेत; राजकारणात टोकाचा विरोध असूनही वैयक्तिक नात्यात कधीही कटुता आली नाही आणि माहेर व सासर दोन्हीकडून आमचे ठाकरे कुटुंबाशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत. याशिवाय, रायगडमधील वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेत चिमुकल्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेऊन प्रशासनाच्या दिरंगाईवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App