विशेष प्रतिनिधी
मुंबई:झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) 33(11) योजनेतील प्रकल्पांचे मुंबईतील सर्वात मोठे लाभार्थी राऊत बंधू असल्याचा आरोप केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी कायदेशीर नोटीस बजावण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्याला भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी (20 नोव्हेंबर 2026) मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सडेतोड प्रत्युत्तर दिले. तुम्ही 1 काय, 100 किंवा 1,000 कायदेशीर नोटिसा पाठवा, भाजप तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही; उलट आणखी 24 तास घ्या आणि तुमच्याशी संबंधित 8 प्रकल्पांना 33(11) नियमाचा किती फायदा झाला, याचा खुलासा करा, असे खुले आव्हान नवनाथ बन यांनी दिले आहे.Navnath Ban
एसआरए प्रकल्पांतील फायदा आणि पत्राचाळ घोटाळ्यावरून राऊतांवर पलटवार
संजय राऊत यांनी एसआरए प्रकल्पांमध्ये ₹30,000 ते ₹40,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत कायदेशीर कारवाईची भाषा केली होती. यावर प्रत्युत्तर देताना नवनाथ बन यांनी दावा केला की, बोरीवली, मुलुंड, वांद्रे पूर्व आणि भांडुप पश्चिम येथील श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट, श्रद्धा मंगलस्मृती, श्रद्धा शेल्टर आणि श्रद्धा स्टे स्पेसेस यांसारखे 7 ते 8 प्रकल्प 100 टक्के पूर्ण झाले असून, या प्रकल्पांना 33(11) नियमाचा सर्वाधिक फायदा झाला आहे. या प्रकल्पांमध्ये नेमका किती हजार कोटींचा फायदा झाला, हे राऊतांनी कागदोपत्री स्पष्ट करावे, तसेच पत्राचाळीत मराठी माणसाला बेघर करून झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 100 दिवस तुरुंगात राहिल्याचा हिशोब महाराष्ट्रासमोर मांडावा, असे ते म्हणाले. यापूर्वी किमान 10 प्रकरणांत नोटिसा पाठवून नंतर न्यायालयात माफी मागण्याची राऊतांची परंपरा असल्याची टीका करत, साताऱ्यातून धमक्यांचे फोन येत असले तरी देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता अशा धमक्यांना घाबरणार नाही, असे बन यांनी ठणकावले.
100 कोटींच्या वसुलीतील शिल्लक रकमेतून दुष्काळग्रस्तांना मदत देण्याचा टोला
घोटाळ्याचे पैसे वसूल करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्यावेत, या संजय राऊत यांच्या विधानावर नवनाथ बन यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील वसुली प्रकरणाचा दाखला दिला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दररोज ₹100 कोटी वसुलीचे टार्गेट देण्यात आले होते; त्या हिशोबाने अडीच वर्षांत सुमारे ₹90,000 कोटी जमा होतात आणि त्यातील निवडणुकांचा खर्च वजा जाता अद्याप उद्धव ठाकरे, अनिल देशमुख व संजय राऊत यांच्याकडे ₹30,000 ते ₹40,000 कोटी शिल्लक असतील, असा आरोप करत या रकमेतून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, असा टोला बन यांनी लगावला.
राहुल गांधींची सावरकरांशी तुलना आणि दादर नामांतर वादावरून जोरदार टीका
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याचे समर्थन करताना राऊत यांनी त्यांची तुलना स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी केल्याचा नवनाथ बन यांनी तीव्र निषेध केला. राहुल गांधी परदेशातून परतल्यानंतर कधी ‘नीट’ तर कधी ‘एसआयआर’ सारखी आंदोलने उभी करतात, त्यामागे परदेशी फंडिंगचा संशय असल्याचे ते म्हणाले. तसेच, सावरकरांना ‘माफीवीर’ म्हणणाऱ्या राहुल गांधींची तुलना सावरकर व नेताजी बोस यांच्याशी करणे म्हणजे केवळ राज्यसभेच्या तिकिटासाठी राऊतांनी सुरू केलेले लांगुलचालन असल्याची टीका बन यांनी केली. यूपीएच्या काळात 13-14 व्या क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आज जगात 4 थ्या क्रमांकावर पोहोचली असल्याचे त्यांनी नमूद केले. यासोबतच दादर मेट्रो स्थानकाचे नाव ‘चैत्यभूमी’ करण्याला विरोध करणाऱ्या राऊतांनी कधी चैत्यभूमीचे दर्शन घेतल्याचा एक तरी फोटो दाखवावा, असे आव्हान देत मुंबई बँकेवर पुन्हा भाजप-महायुतीचाच झेंडा फडकेल, असा विश्वास बन यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App