विशेष प्रतिनिधी
नागपूर:दादर स्थानकाच्या नामांतरणाच्या वादावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी नागपूरचे नामांतर ‘दीक्षाभूमी’ करण्याची मागणी केल्यानंतर, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (20 नोव्हेंबर 2026) नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यावर तीव्र प्रत्युत्तर दिले आहे. नागपूरची दीक्षाभूमी जागतिक स्तरावर प्रसिद्ध असून नागपुरात येणारा प्रत्येक व्यक्ती दीक्षाभूमीला भेट देतो; नागपूर दीक्षाभूमीच्याच नावाने जगभरात ओळखले जात असल्याने संजय राऊत सांगतील तसे करण्याची गरज नाही, असा पलटवार बावनकुळे यांनी केला. या वेळी त्यांनी इंदू मिल स्मारक, भटक्या विमुक्त व फासेपारधी समाजासाठी विशेष मोहीम, सातारा जिल्हा बँक राजकारण आणि राहुल गांधींच्या टीकेवरही सविस्तर भूमिका मांडली.Chandrashekhar Bawankule
इंदू मिलचे स्मारक आमचेच सरकार अवघ्या एका वर्षात पूर्ण करणार
मुंबईतील इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या रखडलेल्या कामावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला बावनकुळे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे काही काळ बांधकाम साहित्य उपलब्ध होण्यास अडचणी आल्याने प्रकल्पाची किंमत वाढली आणि कामाला थोडा विलंब झाला; परंतु प्रकल्पाची किंमत कितीही वाढली तरी राज्य सरकार त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देईल. साहित्य उपलब्ध होताच हे काम दोन वर्षे न लागता अवघ्या एका वर्षात पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, या स्मारकाची सुरुवात आम्ही केली आणि ते पूर्णही आमचेच सरकार करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भटक्या विमुक्त आणि फासेपारधी समाजाच्या विकासासाठी ऐतिहासिक निर्णय
राज्यातील वंचित आणि भटक्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली असल्याची माहिती महसूलमंत्र्यांनी दिली:
विशेष शिबिरे: राज्यातील सर्व महसूली मंडळांमध्ये सेवा हमी कायद्यांतर्गत येणाऱ्या सेवा देण्यासाठी अभियान राबवले जाणार असून, 6, 7 आणि 8 जानेवारी रोजी भटक्या व विमुक्त जाती-जमातींच्या (व्हीजेएनटी) वाड्या-वस्त्या आणि तांड्यांवर विशेष शिबिरे आयोजित करून जन्माचे दाखले, आधार कार्ड आणि घरांच्या मालकी हक्काची (स्वामित्व) कागदपत्रे जागेवरच दिली जातील. यासाठी ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंतच्या लोकप्रतिनिधींची अशासकीय समिती नेमण्यात आली आहे.
फासेपारधी समाजासाठी स्वतंत्र गावठाण: अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) येणाऱ्या पारधी आणि फासेपारधी समाजाच्या विकासासाठी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्रालयात विशेष बैठक पार पडली. या समाजाच्या वाड्या-वस्त्यांसाठी स्वतंत्र गावठाण गठित करणे, तांड्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा देणे, मुलांच्या शिक्षणाची सोय करणे आणि महिला बचत गटांसाठी रोजगारनिर्मितीची साधने उपलब्ध करून देण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत.
सातारा बँक वाद स्थानिक; राहुल गांधींवर ‘स्वप्न के सौदागर’ म्हणत टीका
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून भाजप आणि शिंदे गटात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर बोलताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, बँकांचे राजकारण हे जिल्हास्तरीय आणि स्थानिक पातळीवरचे असते; एखाद्या जिल्ह्यातील मतभेदांना महायुतीचा वाद म्हणता येणार नाही आणि याचा राज्यातील महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच, अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर यावा, जेणेकरून जनतेतील संभ्रम दूर होईल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र धोरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी यांना सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ‘मोदी ज्वर’ चढलेला असतो आणि ते स्वतः पंतप्रधान झाल्याची स्वप्ने पाहत असल्याने ‘स्वप्न के सौदागर’ आहेत. याशिवाय, गुजरातच्या पट्ट्याला हापूस आंब्याचा जीआय टॅग देण्याचा निर्णय चेन्नई न्यायालयाने दिला असून त्याच्याशी महाराष्ट्र शासनाचा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागपूरच्या तिसऱ्या रिंगरोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू असून डिफेन्स न्युक्लिअर एरोस्पेस (डीएनए) प्रकल्पासाठी बागायती जमीन न घेण्याबाबत माहिती घेऊन भूमिका स्पष्ट करू, असेही महसूलमंत्र्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App