विशेष प्रतिनिधी
जळगाव: डिलिमिटेशन विधेयकाच्या निमित्ताने खासदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी ₹150 कोटींचा भाव लावला जात असल्याचा आरोप करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत निशाणा साधला आहे. या आरोपाला प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, खासदारांना एनडीएच्या बाजूने वळवण्यासाठी ₹150 कोटींचा भाव लावला गेला असेल तर मग संजय राऊतच हे पैसे मोजायला गेले होते का आणि ते काय सेंट्रल बँकेचे मॅनेजर आहेत का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. यासोबतच डिलिमिटेशन विधेयकाबाबत सुप्रिया सुळे यांनी मांडलेल्या भूमिकेवर बोलताना, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असून विधेयक समोर आल्यानंतर त्यांचा पक्ष जो निर्णय घेईल तो सर्वांना समजेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
किशोर पाटलांना ‘डबल अक्कल लखलाभ’ म्हणत टोला; एकनाथ खडसेंना 29 तारखेचे आव्हान
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या वादावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत स्वपक्षीयांसह विरोधकांना सुनावले:
आमदार किशोर पाटलांना प्रत्युत्तर: किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेनंतर गुलाबराव पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, किशोर पाटील यांनी ‘आम्हाला कोणी अक्कल शिकवू नये, आमच्या मुलाला डबल अक्कल आहे’ असे म्हणत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे जाहीर केले. यावर पाटील म्हणाले की, मी दोघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता; परंतु जर त्यांना असे वाटत असेल तर त्यांची ही ‘डबल अक्कल’ त्यांनाच लखलाभ असो आणि मुख्यमंत्र्यांना भेटावे की नाही हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे.
एकनाथ खडसेंना आव्हान: जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत ‘घोडा मैदान जवळ आहे’ असे म्हणणाऱ्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांना उत्तर देताना, येत्या 29 तारखेला निकाल काय लागतो ते बघून घ्या आणि आमच्या जागा निवडून आल्यावर सगळे कळेल, असे थेट आव्हान पाटील यांनी दिले.
आनंदराज आंबेडकरांना दिलगिरीचा सल्ला; मराठवाड्यात तीव्र पाणीटंचाई
दरम्यान, दिवंगत नेते अजित पवार यांच्यासंदर्भात आनंदराज आंबेडकर यांनी केलेल्या विधानावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, आनंदराज आंबेडकर यांची निश्चितच जीभ घसरली असून अनावधानाने असे घडले असेल तर त्यांनी दिलगिरी व्यक्त करायला हरकत नाही. तरुणींच्या स्वसंरक्षणासाठी घरोघरी तलवारी वाटण्याच्या विधानावर भाष्य करताना, मुलींनी पर्समध्ये लिपस्टिकऐवजी मिरची पूड ठेवावी असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे; छेडछाडीचे प्रकार वाढल्याने मुलींनी स्वसंरक्षणाची काळजी घेणे गरजेचे असले तरी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये, असा सल्ला त्यांनी दिला. याशिवाय, यंदा पाऊस पडूनही मराठवाड्यातील धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नसल्याने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि अहिल्यानगर या भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून टँकरची संख्या वाढत असल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्य केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App