मुंबई, दि. २३ : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या पाणीटंचाईवर तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असून, पाणीपुरवठ्याच्या उपलब्ध स्रोतांचा प्रभावी वापर, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि पाणीचोरीला आळा घालण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिले.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पाणीटंचाईच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, विरोधी पक्षनेता अरविंद म्हात्रे, आयुक्त मंगेश चितळे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे ६ किलोमीटर काम पूर्ण; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा
यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राज्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढते तापमान व कमी पर्जन्यमानामुळे पाण्याच्या वाढत्या बाष्पीभवनामुळे उपलब्ध जलसाठ्यावरही परिणाम होत असून, भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन आतापासूनच पर्यायी उपाययोजनांचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पनवेल महानगरपालिका परिसरातील नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी न्हावा शेवा योजना टप्पा ३ ची उर्वरित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.
पाणीपुरवठा व्यवस्थेशी संबंधित संरचनात्मक आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेऊन पालक मंत्री गोगावले म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासह संबंधित यंत्रणांनी पाणी पुरवठा प्रश्नी समन्वयाने काम करावे. पनवेल महानगरपालिका व परिसरातील लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांच्या उपस्थितीत लवकरच स्वतंत्र बैठक घेतली जाईल, असेही ते म्हणाले.
रोजगार हमी योजना व पालक मंत्री गोगावले, म्हणाले, पाणीटंचाईच्या काळात पाणीचोरी तसेच टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. पाणीचोरी रोखण्याबाबत मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट निर्देश दिले असल्याचे ते म्हणाले. पाणीटंचाईच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये याची दक्षता घ्यावी. केवळ टँकरपुरवठ्यावर अवलंबून न राहता पाणी साठवणूक, वितरण व्यवस्था आणि पर्यायी जलस्रोत यांचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App