विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरात स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) ४,४६२ सदनिकांच्या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर म्हाडाने हा निर्णय घेतला आहे. आता इच्छुक नागरिकांना १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार असून, २६ नोव्हेंबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे. MHADA Lottery
अर्ज करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत
म्हाडाने २४ ऑगस्ट रोजी ४,४६२ सदनिकांच्या सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, अर्जदारांना ऑनलाइन कागदपत्रे सादर करताना अडचणी येत असल्याने अर्ज प्रक्रियेसाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
नवीन वेळापत्रकानुसार, इच्छुक नागरिकांना १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अनामत रक्कम (ईएमडी) भरण्यासाठी १५ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत वेळ देण्यात आला आहे. तसेच, आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे शुल्क भरण्याची अंतिम मुदत १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.
म्हाडाच्या सोडतीचे नवीन वेळापत्रक
प्रक्रिया
अंतिम तारीख व वेळ
ऑनलाइन अर्ज १५ ऑक्टोबर, सायं. ५ वाजेपर्यंत
ईएमडी भरणे १५ ऑक्टोबर, रात्री ११:५९ पर्यंत
आरटीजीएस/एनईएफटी शुल्क १६ ऑक्टोबर, दुपारी ३ पर्यंत
प्रारूप पात्र अर्जांची यादी १२ नोव्हेंबर, सायं. ७ वाजता
हरकती नोंदवण्याची मुदत १४ नोव्हेंबरपर्यंत
अंतिम पात्र अर्जांची यादी २० नोव्हेंबर, सायं. ७ वाजता
म्हाडाची सोडत २६ नोव्हेंबर, सकाळी ११ वाजता
विजेत्यांची यादी २६ नोव्हेंबर, सायं. ६ वाजता
उत्पन्नाच्या पुराव्यासाठी महत्त्वाची माहिती
अर्जदारांसाठी उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर विवरणपत्र सादर करण्याबाबतही महत्त्वाची सवलत देण्यात आली आहे. २०२४-२५ किंवा २०२५-२६ या आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षाचा पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे.
मुदतवाढीमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. इच्छुक अर्जदारांनी अंतिम मुदतीपूर्वी आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App