3 वर्षांपासून उभा असलेला आंदोलनाचा मंडप अखेर हटवला; जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘आता पुढचं आंदोलन…’

Jarange

विशेष प्रतिनिधी 

जालना : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी उभारण्यात आलेला मंडप आणि व्यासपीठ अखेर हटवण्यात आले आहे. ग्रामस्थ आणि सरपंचांच्या निर्णयानंतर अवघ्या काही तासांत हा मंडप हटवण्यात आला. तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ आंदोलनाच्या अनेक घडामोडींचा साक्षीदार राहिलेला हा मंडप हटवल्यानंतर या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, यावर मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया देत यापुढे अंतरवाली सराटीत आंदोलन होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

29 ऑगस्ट 2023 रोजी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर हे ठिकाण मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख केंद्र बनले. आंदोलनाच्या विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलकांची गर्दी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून या मंडपाबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू होती. त्यानंतर ग्रामस्थ, सरपंच आणि मनोज जरांगे पाटील यांच्या स्थानिक कोअर कमिटीमध्ये झालेल्या संवादानंतर मंडप आणि व्यासपीठ हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

‘अंतरवाली येथील हे शेवटचे आंदोलन होते’

मंडप हटवल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी या निर्णयावर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “या आंदोलनात अंतरवाली येथील शेवटचं आंदोलन असा शब्द वापरला आहे. अंतरवाली येथील व्यासपीठ आणि सर्व साहित्य आता काढले आहे. आता सरकारने केले नाही तर इथून पुढे पाटोदापासून पुढे आंदोलन होईल.”

ग्रामसभा आणि आंदोलनाचा थेट संबंध नसल्याचेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. “ग्रामसभा आणि आंदोलनाचा काहीही संबंध नाही. राज्यात कुठेही आंदोलन होऊ शकतं. आंदोलन येवला असो किंवा अंतरवाली, कुठेही होऊ शकते,” असे त्यांनी सांगितले.

‘आता अंतरवालीत आंदोलन होणार नाही’

अंतरवाली सराटी येथे यापुढे आंदोलन केले जाणार नसल्याचेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही ग्रामस्थांकडून आंदोलनाबाबत विरोध झाला होता आणि ग्रामसभेत ठराव करण्यात आला होता. मात्र त्यावेळी आपण आंदोलन थांबवले नसल्याचे त्यांनी सांगितले.

“आंदोलन येवला आणि परळी गावातील कुठल्याही गावात होऊ शकते. पश्चिम महाराष्ट्रातही आंदोलन होऊ शकते. मी थांबलो नाही, आंदोलन सुरू आहे. यापुढे अंतरवाली येथे आंदोलन होणार नाही. अंतरवाली येथील हे शेवटचे आंदोलन होते,” असे जरांगे पाटील म्हणाले.

‘गावकऱ्यांनी रक्त सांडले, मी त्यांचा आभारी’

अंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांचे आणि ओबीसी समाजातील बांधवांचे आभार मानताना जरांगे पाटील यांनी आंदोलनादरम्यान गावकऱ्यांनी दिलेल्या सहकार्याचा उल्लेख केला.


‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप


“तीन वर्षे ते गाव काढले आहे. तेथील लोकांनी रक्त सांडले आहे. ओबीसी बांधवांनी शेती दिली. त्या सर्व गावकऱ्यांचा मी आभारी आहे,” असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, सरकारने मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलनाची पुढील दिशा अधिक आक्रमक होण्याचे संकेत त्यांनी दिले. “आता पुढे पाटोदापर्यंत आंदोलन गेले आहे. तीन महिन्यात केले नाही तर पुढे मुंबईकडे जाऊ,” असा इशाराही त्यांनी दिला.

दुष्काळाच्या मुद्द्यावरही सरकारला घेरले

राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवरही मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले. राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र दुष्काळ जाहीर करताना सरकारने सरसकट निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

“सरकारने दुष्काळ जाहीर करताना सरसकट जाहीर करायला पाहिजे. अर्धवट करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नयेत,” अशी टीका त्यांनी केली.

शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि अनुदानाचा पूर्ण लाभ मिळायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 80 ते 90 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच दुष्काळग्रस्त भागात पाणी आणि चाऱ्याची तातडीने व्यवस्था करण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली.

अंतरवाली सराटीतील आंदोलनाचा मंडप हटवल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा काय असणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन थांबले नसल्याचे स्पष्ट करत पुढील आंदोलनासाठी पाटोदा, येवला, परळी किंवा पश्चिम महाराष्ट्रातील ठिकाणांचे पर्याय खुले ठेवले आहेत.

Jarange’s first reaction; he said, “Now, the next agitation…”

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात