विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्य सरकारने बुधवारी (25 नोव्हेंबर) अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत यापुढे राज्यात बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन पुलासोबत ‘पूल वजा बंधारा’ बांधणे बंधनकारक करण्यात आले असून, प्रत्येक पुलाखाली किमान 1 मीटर पाणी अडवले जाणार आहे.
तसेच, पशुधनाचा चारा प्रश्न सोडवण्यासाठी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांसह गरज असलेल्या भागांत तातडीने चारा छावण्या सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीला जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.
प्रत्येक नवीन पुलासोबत बंधारा; रस्ते बांधकामासाठी वापरणार तलावांतील गाळ
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा शेती, भूजल पुनर्भरण आणि स्थानिक पाणीपुरवठ्यासाठी वापर व्हावा, यासाठी सरकारने जलसंधारणाचे मोठे निर्णय घेतले आहेत:
‘पूल तिथे बंधारा’ धोरण: सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी (MSRDC), एमएमआरडीए (MMRDA), सिडको, नैना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नदी-नाल्यांवर बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन पुलाला बंधारा जोडणे बंधनकारक राहील; तसेच शक्तिपीठ महामार्गावरही पूल वजा बंधारे उभारण्याचे नियोजन आहे.
महामार्गांसाठी तलावांतील गाळ: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि बिहारच्या धर्तीवर राष्ट्रीय महामार्ग व मुख्य रस्त्यांच्या बांधकामासाठी तलावांतील माती व मुरूम वापरला जाणार आहे; याबाबत आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार केला जाईल.
गाळमुक्त धरण योजनेला मुदतवाढ: शेतकऱ्यांना मोफत गाळ देण्याची योजना 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली असून, गाळ काढण्यासाठी प्रति घनमीटर ₹32 तर वाहतुकीसाठी प्रति घनमीटर ₹37 दर (कमाल ₹37,500 अनुदान) निश्चित करण्यात आले आहेत.
खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे ६ किलोमीटर काम पूर्ण; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा
चारा छावण्या, वनपट्टेधारकांना मदत आणि रोजगार हमीची मजुरी वाढवण्याचा प्रस्ताव
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालक, शेतकरी आणि मजुरांना दिलासा देण्यासाठी बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले:
चारा छावण्या व गायरान जमीन धोरण: सोलापूर आणि धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार तातडीने चारा छावण्या सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी 2019 चे जुने दर लागू राहतील; तसेच गोशाळांसाठी संस्थांना 2 ते 3 वर्षांच्या भाडेतत्त्वावर गायरान जमीन देण्याबाबत आणि ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार गायरान जमिनीवर 2 ते 3 एकरांचे छोटे तलाव बांधण्याबाबत शासन सकारात्मक आहे.
वंचित शेतकरी व फार्मर आयडी: चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यासह राज्यातील वनपट्टेधारक आणि अधिकृत नोंद नसताना प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹5,000 अंतिम अनुदान व भविष्यात एनडीआरएफ-एसडीआरएफची मदत दिली जाईल; तसेच प्रलंबित फार्मर आयडी काढण्यासाठी सुलभ कार्यपद्धती (SOP) जारी करण्यात आली आहे.
रोजगार हमी मजुरीत वाढ आणि पाणीपुरवठा: मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेची दैनिक मजुरी ₹317 वरून ₹375 करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, तर जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण नळ पाणीपुरवठा योजनांना तातडीने वीजजोडणी देऊन कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, दुष्काळामुळे सुकत चाललेल्या फळबागा वाचवण्यासाठी मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या मागणीनुसार आर्थिक मदतीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महसूलमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच, आमदार अभिमन्यू पवार यांनी ऊस पिकाचा मूरघास तयार करण्यास परवानगी देण्याची केलेल्या मागणीवर पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाणार असून, आमदार रोहित पवार यांनी पत्राद्वारे मांडलेल्या दुष्काळी मागण्यांवरही लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App