विशेष प्रतिनिधी
पुणे: पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर बुधवारी दुपारी भरदिवसा घडलेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्याच्या थरारक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या मंदार मारुती किवळे याच्यावर 6 ते 7 हल्लेखोरांनी आधी पिस्तुलातून गोळीबार केला आणि त्यानंतर पाठलाग करून कोयत्याने सपासप वार करत दोन्ही हात छाटले. या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपींचा पाठलाग करत पुणे पोलिसांनी अवघ्या काही तासांत 6 संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी दोघांचा हल्ल्यात थेट सहभाग असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
कात्रजमधील हत्येचा बदला घेण्यासाठी 7 जणांनी रचला थरारक कट
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा हल्ला 20 एप्रिल 2025 रोजी पुण्यातील कात्रज (संतोषनगर) परिसरात झालेल्या शुभम सुभाष चव्हाण याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी करण्यात आला आहे:
जामिनावर सुटताच गेम: शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मंदार किवळे हा अवघ्या चार दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता आणि सुनावणीसाठी कोर्टात आला असता त्याच्यावर हा हल्ला झाला.
खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे ६ किलोमीटर काम पूर्ण; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा
हल्ल्याचा घटनाक्रम: दोन दुचाकींवरून (अॅक्सेस आणि अॅक्टिव्हा) आलेल्या 6 ते 7 हल्लेखोरांनी कोर्टाबाहेर फिल्डिंग लावली होती. गोळीबारानंतर जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्या मंदारचा पाठलाग करून हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर आणि हातांवर कोयत्याने वार केले, ज्यात त्याचे दोन्ही हात तुटून लोंबकळले. हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळी पिस्तूल टाकून दुचाकींवरून पसार झाले.
संशयित आरोपी व उपचार: या प्रकरणी कथित सूत्रधार अक्षय चव्हाण याच्यासह बाब्या पवार, यानप्या, रोहन कानगुडे, गणेश चव्हाण, अमोल रामचंद्र चव्हाण आणि गणेश सुभाष चव्हाण यांची नावे समोर आली आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंदारला पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत; पुढील तपासासाठी गुन्हे शाखेची 8 ते 10 पथके तैनात करण्यात आली आहेत.
कोर्टाच्या सुरक्षेचा ढिसाळपणा चव्हाट्यावर; विरोधकांची फडणवीसांवर टीका
अवघ्या दोन दिवसांपूर्वीच पुणे न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाली होती; त्यानंतरही न्यायालय परिसरातील सुरक्षा यंत्रणेचा ढिसाळपणा या घटनेमुळे उघड झाला आहे. भरदिवसा कोर्टाच्या दारात घडलेल्या या रक्तरंजित थरारानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App