हवामान बदल, अनियमित पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चावर मात करण्यासाठी आधुनिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन; कराडमध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
विशेष प्रतिनिधी
कराड: बदलते हवामान, अनियमित पाऊस, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील चढ-उतार यांसारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी केवळ पीक उत्पादनावर अवलंबून न राहता पशुपालन, दुग्धव्यवसाय, कृषी प्रक्रिया उद्योग आणि शेतीपूरक व्यवसायांकडेही लक्ष द्यावे. आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीपूरक उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासोबतच ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
कराड येथे आयोजित २१ व्या राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सव २०२६ चे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार मनोज घोरपडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदयसिंह उंडाळकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, शेतकरी हा देशाच्या विकासाचा कणा आहे. शेती क्षेत्रात सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून सुधारित कृषी अवजारे, आधुनिक सिंचन पद्धती, पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि कृषी प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून शेती अधिक फायदेशीर करता येऊ शकते. अशा आधुनिक तंत्रज्ञानाची आणि व्यवसायाच्या संधींची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी प्रदर्शनांसारखी व्यासपीठे महत्त्वाची ठरतात.
स्वर्गीय विलासराव उंडाळकर यांच्या विचारांतून सुरू झालेल्या या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना विविध कृषी प्रयोग पाहण्याची, आधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्याची आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे हे प्रदर्शन शेतकऱ्यांना शेतीच्या विकासासाठी नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे ६ किलोमीटर काम पूर्ण; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा
शेतीसोबत पूरक व्यवसायांचा अवलंब करा!
सध्याच्या काळात राज्यासमोर दुष्काळसदृश परिस्थितीचे आव्हान आहे. हवामानातील बदल, पावसाची अनिश्चितता, उत्पादन खर्चात होणारी वाढ आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतीसोबत पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि कृषी प्रक्रिया उद्योगांची जोड देणे आवश्यक आहे. शेतीला उद्योगाची जोड मिळाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे पर्यायी स्रोत निर्माण होतील आणि ग्रामीण भागातील रोजगारालाही चालना मिळेल, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणे शासनाचे प्राधान्य
दुष्काळ आणि नैसर्गिक संकटांच्या काळात शेतकऱ्यांना आधार देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात आहे.
शेतीसमोरील संकटांचा सामना करण्यासाठी शासनासोबतच प्रशासन, सहकारी संस्था, कृषी संस्था आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. पाण्याचा काटकसरीने वापर, जलसंधारण, योग्य पाणी नियोजन आणि उपलब्ध जलसंपत्तीचा प्रभावी वापर यावर सर्वांनी भर द्यावा. संकट कितीही मोठे असले तरी एकजुटीने त्याचा सामना केल्यास त्यातून मार्ग काढता येतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अजितदादांच्या विकासाच्या संकल्पना पुढे नेण्याचे आवाहन
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. कराडच्या भूमीशी अजितदादांचे जिव्हाळ्याचे नाते होते. प्रीतिसंगम ही राज्याच्या विकासाचा संगम घडविणारी भूमी आहे. कराडने देशाला दिशा देण्याचे काम केले असून सहकार चळवळीच्या विकासात या भूमीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे त्या म्हणाल्या.
गावागावांत विकास पोहोचला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हा विचार पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. विकासकामांचा सखोल अभ्यास, निर्णयक्षमता, वेळेचे नियोजन आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची तळमळ ही अजितदादांच्या कार्याची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या विकासाच्या संकल्पना पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
युवकांनीही कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा
शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता आधुनिक उद्योग आणि रोजगारनिर्मितीचे प्रभावी साधन म्हणून पाहण्याची गरज आहे. कृषी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नव्या संधी, आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी उद्योजकतेची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांसोबतच युवकांनीही या प्रदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करता येतील, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी कृषी विभाग, जिल्हा परिषद, आत्मा विभाग तसेच संबंधित संस्था, पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक प्रयत्न केले आहेत. प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून त्यांनी राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
Farmers, along with traditional farming, should also turn towards animal husbandry and the dairy business; an appeal by Sunetra Pawar.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App