विशेष प्रतिनिधी
मुंबई : निवडणूक आयोगाच्या कामकाजावर राहुल गांधी आणि काँग्रेसकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तिन्ही निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आयोगातील मतभेदांबाबत पसरवलेला कथित ‘फेक नरेटिव्ह’ उद्ध्वस्त झाला आहे. संविधानाचे पुस्तक हातात घेऊन संवैधानिक संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी करण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
फडणवीस म्हणाले, “मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की राहुल गांधींचे डिझाइन वेगळे आहे. संवैधानिक संस्थांवर रोज आरोप करायचे, त्यांना प्रश्नांकित करायचे आणि त्यांच्यावरील लोकांचा विश्वास घालवायचा, अशा पद्धतीने ते काम करत आहेत. राहुल गांधींना संविधानाने निर्माण केलेल्या संस्थाच मान्य नाही.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या, म्हणजेच एसआयआरच्या प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या वादाबाबत फडणवीस म्हणाले , तिन्ही निवडणूक आयुक्तांनी एसआयआरसह सर्व प्रक्रिया एकमताने पार पडल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. आयोगामध्ये या विषयावर मतभेद नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्याबाबतचे आरोप निराधार ठरतात.कॅबिनेट सचिवांकडे पाठवण्यात आलेल्या पत्राबाबतही चुकीचा अर्थ काढण्यात आला . हे पत्र कोणत्याही धोरणात्मक विषयावरील मतभेदांशी संबंधित नसून प्रतिनियुक्तीवरील एका नियुक्तीशी संबंधित आहे. मात्र, त्या पत्राच्या आधारे निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न झाला.
‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप
फॉर्म क्रमांक ६ वरून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तर दिले. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी फॉर्म क्रमांक ६ वापरला जातो. या फॉर्मचा सध्याचा नमुना सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवलेल्या स्वरूपातच असल्याचा दावा करत, त्यावरून संभ्रम निर्माण केला जात असल्याचे फडणवीस म्हणाले. न्यायालयाच्या निर्णयाबाबत आणि निवडणूक प्रक्रियेबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण करणे योग्य नसल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.
एका वृत्तपत्रातील बातमीवर आधारित आंदोलन सुरू असल्याचा उल्लेख करत, त्या बातमीतील दावे आयुक्तांच्या पत्रकार परिषदेनंतर टिकत नसल्याचे फडणवीस म्हणाले. जनतेचा विश्वास मिळवता येत नसल्यामुळे काँग्रेस निवडणूक व्यवस्थेबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान सभेतील शेवटच्या भाषणाचा संदर्भ देत फडणवीस यांनी राहुल गांधींवर कठोर टीका केली. संवैधानिक संस्थांना सातत्याने बदनाम केल्यास संविधानावरील लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला. राहुल गांधींची विचारसरणी ‘अतिडावी’ झाल्याचा आरोप करत, भारतात साम्यवादी राजवट आणू देणार नाही, असेही ते म्हणाले. “संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याची ही मोहीम यशस्वी होणार नाही. भारताचे संविधान आणि त्याने निर्माण केलेल्या संस्था अबाधित राहतील,” असे फडणवीस यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App