विशेष प्रतिनिधी
मुंबई : विरोधक संविधानाचा वारंवार उल्लेख करत असले, तरी प्रत्यक्षात संसदेतील चर्चेला सामोरे जाण्यापासून ते पळ काढत आहेत. चर्चा झाली तर त्यांचे दुहेरी मापदंड देशासमोर उघड होतील, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. CM Devendra Fadnavis
जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गेल्या काही दिवसांपासून संसदेचे कामकाज ठप्प केले आहे. यावर भाष्य करताना फडणवीस यांनी विरोधकांच्या भूमिकेवर जोरदार निशाणा साधला.
फडणवीस म्हणाले की, संविधानाबाबत मोठमोठ्या गोष्टी करणारे विरोधक प्रत्यक्ष चर्चेपासून मात्र दूर जात आहेत. लोकसभा हे लोकशाहीचे सर्वोच्च व्यासपीठ असून, कोणत्याही विषयावर सविस्तर चर्चा होणे हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, विरोधक सातत्याने चर्चेपासून दूर पळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘चर्चा झाली तर दुहेरी मापदंड उघड होतील’
लोकसभेत चर्चा झाल्यास विरोधकांचे दुहेरी मापदंड देशासमोर स्पष्ट होतील, असा दावा फडणवीस यांनी केला. झारखंडच्या मुद्द्यावरही त्यांना प्रश्नांना सामोरे जावे लागेल. त्या विषयावर त्यांनी केलेल्या मौनाचे स्पष्टीकरण द्यावे लागेल, त्यामुळेच विरोधक चर्चेपासून पळ काढत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, मुंबईच्या लोकल रेल्वेबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे फडणवीस यांनी स्वागत केले. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या डब्यांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. मुंबईकरांना मेट्रो ट्रेनप्रमाणे आधुनिक, स्वच्छ आणि वातानुकूलित लोकलचे डबे उपलब्ध करून देण्याची सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
या निर्णयासाठी फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. या प्रक्रियेला काही काळ लागला असला, तरी आता आधुनिक लोकलच्या दिशेने मार्ग मोकळा झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेत आधुनिक आणि वातानुकूलित डबे उपलब्ध झाल्यास प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App