विशेष प्रतिनिधी
मुंबई: उत्तर मुंबईतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना सचिव तथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. Shiv Sena
माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे मुंबई समन्वयक निखिल प्रकाश गुळेकर यांच्यासह शाने आलम खान, भरत चोपडे, विधानसभा समन्वयक अभिषेक चव्हाण आणि उपशाखा प्रमुख आनंद कातुर्डे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती देण्यात आली. ठाकरे गटातील शेकडो कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश केल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
‘शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास’
पक्षप्रवेशावेळी सिद्धेश कदम यांनी मुंबई उपनगरातील अनेक कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत येत असल्याचे म्हटले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे नेणाऱ्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी हे कार्यकर्ते पक्षात दाखल होत असल्याचा दावा त्यांनी केला. काही कार्यकर्त्यांना त्यांच्या पूर्वीच्या पक्षात अपेक्षित राजकीय संधी मिळत नसल्याचेही कदम यांनी म्हटले.
या प्रवेशामुळे उत्तर मुंबईतील पक्षसंघटना आणखी मजबूत होईल, असा दावा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, सिद्धेश कदम यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू असून तपासातून वस्तुस्थिती समोर येईल, असे त्यांनी म्हटले. दिशा सालियन यांना न्याय मिळायला हवा, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयने दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. उपलब्ध माहितीनुसार एफआयआरमध्ये कोणालाही आरोपी म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेले नाही आणि दिशा यांच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत उल्लेख केलेल्या व्यक्तींच्या भूमिकेचा तपास केला जात आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या इंदूरमधील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून निर्माण झालेल्या वादावरही कदम यांनी प्रतिक्रिया दिली. या कार्यक्रमात कॉमेडियन पुलकित मणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केली होती आणि राहुल गांधी त्यांच्यासोबत मंचावर सहभागी झाले होते. या कार्यक्रमावर भाजपच्या अनेक नेत्यांनी टीका केली, तर काँग्रेस आणि काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मिमिक्रीचा बचाव केला.
कदम यांनी या प्रकारावर टीका करत राहुल गांधी यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कुटुंबीयांसंदर्भातील कथित उल्लेखांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
उत्तर मुंबईतील या पक्षप्रवेशानंतर स्थानिक पातळीवरील शिवसेनेच्या संघटनात्मक हालचालींकडे लक्ष लागले असून, आगामी राजकीय घडामोडींमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App