विशेष प्रतिनिधी
नागपूर : गडचिरोलीच्या दौऱ्यावर निघालेले उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरहून गडचिरोलीकडे रवाना होण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर टेक ऑफच्या वेळी पायलटच्या निदर्शनास हा बिघाड आला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हेलिकॉप्टरचे उड्डाण तात्काळ रद्द करण्यात आले.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे गडचिरोलीतील सूरजागड प्रकल्पाच्या पाहणीसाठी निघाले होते. सकाळी पावणे नऊच्या सुमारास त्यांनी नागपूरहून हेलिकॉप्टरने गडचिरोलीला जाण्याची तयारी केली. मात्र, हेलिकॉप्टर सुरू केल्यानंतर टेक ऑफ घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान तांत्रिक समस्या असल्याचे पायलटच्या लक्षात आले.
पायलटने प्रसंगावधान राखत उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठा धोका टळला. हेलिकॉप्टरने प्रत्यक्ष उड्डाण घेतलेच नसल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी रस्ते मार्गाने गडचिरोलीला जाण्याचा निर्णय घेतला.
घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, “सकाळी पावणे नऊ वाजता नागपूरहून सूरजागड प्रकल्पाच्या पाहणीसाठी निघालो होतो. हेलिकॉप्टर स्टार्ट केल्यानंतर टेक ऑफ घेताना त्यात बिघाड असल्याचे पायलटच्या लक्षात आले. पायलटने वेळीच लक्ष दिल्याने आम्ही टेक ऑफ घेतलाच नाही. आता रस्ते मार्गाने गडचिरोलीला निघालो आहोत.”
दरम्यान, हेलिकॉप्टरच्या उड्डाणापूर्वी करण्यात येणाऱ्या तांत्रिक तपासणीत हा बिघाड का लक्षात आला नाही, असा सवाल स्थानिक शिवसैनिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सूरजागड प्रकल्पाची पाहणी
उदय सामंत यांच्या गडचिरोली दौऱ्यामागे सूरजागड प्रकल्पाची पाहणी हा प्रमुख उद्देश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-सूरजागड विकास एक्सप्रेसची घोषणा केली होती. विदर्भातील दळणवळणाचे जाळे मजबूत करण्यासोबतच खनिज संपत्तीला विकासाशी जोडण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, त्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत गडचिरोलीच्या दौऱ्यावर जात आहेत. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानंतरही त्यांनी दौरा रद्द न करता रस्ते मार्गाने गडचिरोली गाठण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App