विशेष प्रतिनिधी
नाशिक : राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या प्रकृतीची पर्वा न करता शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत करपलेल्या पिकांची पाहणी केली.
भुजबळ यांची तब्येत बरी नसल्याचे त्यांच्या प्रकृतीवरून स्पष्टपणे जाणवत होते. त्यांनी डोळ्याला गॉगल आणि तोंडाला मास्क लावला होता. चेहऱ्यावर थकवा जाणवत असतानाही त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी चालताना त्यांनी सुरक्षारक्षकाच्या खांद्यावर हात ठेवून आधार घेतला.
शेतातील करपलेली आणि नुकसान झालेली पिके पाहून भुजबळ यांनी संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. पिकांची स्थिती, झालेल्या नुकसानीचे प्रमाण तसेच शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनीही आपल्या नुकसानीची माहिती भुजबळ यांच्यासमोर मांडली.
‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप
पावसाच्या अनियमिततेचा आणि प्रतिकूल हवामानाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून काही भागात पिके करपल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
दरम्यान, प्रकृती ठीक नसतानाही भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचे या दौऱ्यात दिसून आले. आजारपणामुळे चेहऱ्यावर थकवा जाणवत असतानाही त्यांनी करपलेल्या पिकांची पाहणी केली. त्यामुळे भुजबळ यांच्या या पाहणी दौऱ्याची चर्चा होत आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची माहिती घेण्यात आली असून, पुढील काळात शासनाकडून काय मदत जाहीर केली जाते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App