विशेष प्रतिनिधी
बीड : केज तालुक्यात २० जून रोजी झालेल्या विलास घुले हत्या प्रकरणावरून बीडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात आपल्या मुलाचे नाव जोडले जात असल्याच्या आरोपांवर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अटक केलेल्या आरोपींच्या कॉल डिटेल रेकॉर्डमध्ये (CDR) आपल्या मुलाचा कुठेही संबंध आढळला, तर आपण स्वतः त्याला पोलिसांच्या हवाली करू, असे खुले आव्हान सोनवणे यांनी दिले.
विलास घुले हत्या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि सखोल पद्धतीने व्हावा, यासाठी तो थेट केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवावा, अशी मागणीही सोनवणे यांनी केली आहे.
सोनवणे म्हणाले, “या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या सीडीआरमध्ये माझ्या मुलाचे नाव कुठेही आढळले, तर मी स्वतः त्याला पोलिस ठाण्यात नेऊन हजर करेन. माझा मुलगा पळून गेलेला नाही आणि तो कुठेही लपत नाही.”
आपल्या मुलाचा या हत्याकांडाशी कोणताही संबंध नसतानाही केवळ राजकीय हेतूने त्याचे नाव प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आरोपी नसतानाही आपल्या मुलाचे नाव गुन्ह्यात टाकावे, त्याला अटक करावी आणि नंतर सोडून द्यावे, अशा स्वरूपाची चर्चा आपल्यापर्यंत पोहोचल्याचेही सोनवणे यांनी सांगितले.
“एखाद्या व्यक्तीचा गुन्ह्याशी कोणताही संबंध नसताना केवळ राजकीय कारणासाठी त्याचे नाव कसे घेता येईल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सीआयडी तपासावरही प्रश्नचिन्ह
विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्याच्या निर्णयावरही सोनवणे यांनी प्रश्न उपस्थित केले. सकाळी अर्ज दिल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी सीआयडी तपासाचे आदेश काढण्यात आल्याचा दावा करत त्यांनी सरकारच्या निर्णय प्रक्रियेवरच सवाल उपस्थित केला.
“महाराष्ट्र शासन इतक्या वेगाने निर्णय घेते का?” असा खोचक प्रश्न सोनवणे यांनी केला.
बीड पोलिसांनी यापूर्वीच एका आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले होते. असे असताना तपास तातडीने सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याने राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांचा बीड पोलिसांवरील विश्वास उरला नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
‘दोषींवर कारवाई करा, निरपराधांना गोवू नका’
या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी पुन्हा एकदा करत सोनवणे यांनी कोणताही दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची भूमिका स्पष्ट केली. मात्र, निरपराध व्यक्तीचे नाव केवळ राजकीय हेतूने गुन्ह्यात जोडले जाऊ नये, असे त्यांनी म्हटले.
“आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही, त्यामुळे समाजात उजळ माथ्याने फिरत आहोत. काही आरोपी सत्ता असतानाही पळून गेले होते,” असा टोला लगावत सोनवणे यांनी या प्रकरणाच्या तपासावरून सुरू असलेल्या राजकीय वादाला आणखी धार दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App