विशेष प्रतिनिधी
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना युवा नेते युगेंद्र पवार यांनी सूचक उत्तर देत विराम देण्याचा प्रयत्न केला. “आमचा पक्ष भाजपसोबत जाणार का, हे आता पवार साहेबांनाच विचारले पाहिजे. मात्र, मला तरी वाटत नाही की आम्ही भाजपसोबत जाऊ,” असे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले. Yugendra Pawar
बारामती येथे बुधवारी (ता. १९) एका खासगी शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी १६ ऑक्टोबर रोजी विद्या प्रतिष्ठान येथील प्रेरणास्थळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केल्याचे सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि भाजप यांच्यातील संभाव्य राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरू झाली होती. यावर युगेंद्र पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
युगेंद्र पवार म्हणाले की, सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांच्या विवाहाच्या स्वागत समारंभात आपलीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली होती. मात्र, एखाद्या कार्यक्रमात पंतप्रधानांची भेट झाली म्हणून त्यावरून राजकीय संपर्क किंवा नवी समीकरणे जोडणे योग्य नाही.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भाजपचे नेते नाहीत, तर ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे पंतप्रधान म्हणून मलाही त्यांचा अभिमान आहे. कामासाठी कोणालाही भेटण्यात गैर काहीच नाही. सत्तेत असणाऱ्यांना भेटून कामे मार्गी लावणे योग्य आहे. विरोधक म्हणजे शत्रू नव्हे. एकमेकांचे गळे धरायचे का? राजकारण असे नसते,” असे युगेंद्र पवार यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांचा एकत्रित फोटो पाहिल्याचा संदर्भ दिला. पूर्वी वैचारिक मतभेद असतानाही राजकीय नेते एकमेकांशी संवाद साधत होते, असे ते म्हणाले. आजच्या नव्या पिढीनेही अशाच प्रकारचे वैचारिक आणि सुसंस्कृत राजकारण पुढे नेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“जनतेनेही निष्ठावान लोकांना साथ दिली पाहिजे. तरच आपण राजकारणात बदल घडवून आणू शकू,” असे युगेंद्र पवार यांनी नमूद केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App