डेटा सेंटरला विरोध का? गणेश नाईकांचा मोठा खुलासा; TDR वादावरही थेट निशाणा

विशेष प्रतिनिधी 

ठाणे : ठाण्यात भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. कथित TDR प्रकरणावरून वनमंत्री तथा भाजप नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, गणेश नाईक यांनी ठाण्यातील विकासकामांवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेटा सेंटरच्या गरजेवर भर दिला असला तरी ठाण्यातील प्रस्तावित डेटा सेंटरला आपला वैयक्तिक विरोध असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. Ganesh Naik

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे गणेश नाईक यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी TDR प्रकरण, डेटा सेंटर तसेच परिवहन विभागाच्या कार्यक्रमातील गैरहजेरीबाबत माध्यमांशी संवाद साधला.

  • ‘ज्या जागेचा वापरच होणार नाही, त्याचा भार ठाणेकरांनी का सहन करावा?’

TDR प्रकरणावर बोलताना गणेश नाईक म्हणाले की, उच्च न्यायालयाने TDR देण्याचे आदेश दिले, त्यावेळी महापालिका आयुक्तांनी कोणतीही भूमिका मांडली नाही. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. संबंधित जमीन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) परिसरातील असून, पार्कच्या इको-सेंसिटिव्ह झोनमध्ये TDR देता येत नसल्याची आपली माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.

“हा TDR २७०० कोटींचा नसून सुमारे ४००० कोटी रुपयांचा आहे. ज्या जागेचा वापरच होणार नाही, अशा जागेसाठी ठाण्यातील जनतेने का भार सहन करावा?” असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला.

या प्रकरणात ठाण्यातील नागरिक सर्वोच्च न्यायालयात जाणार असून, नवी मुंबईतील एक संस्थाही न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. “जनता जागृत आहे. आपल्याला पाहिजे म्हणून काहीही करता येणार नाही. याचे कर्ते करविते कोण आहेत, हे मला माहीत आहे,” असेही नाईक म्हणाले.

  • ‘डेटा सेंटरला माझा वैयक्तिक विरोध’

डेटा सेंटरच्या मुद्द्यावरही गणेश नाईक यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “डेटा सेंटरला मोठ्या प्रमाणात वीज आणि पाणी लागते. तसेच त्याठिकाणी ध्वनी प्रदूषणही होते. डेटा सेंटरची गरज आहे, पंतप्रधानांनीही त्याबाबत सांगितले आहे. मात्र, या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध आहे,” असे नाईक यांनी स्पष्ट केले.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी TDR प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, विभागाने पूर्ण प्रयत्न केले; मात्र ठाणे महापालिकेने यापूर्वीच TDRची प्रक्रिया पूर्ण करून ती न्यायालयात सादर केली होती. यावर नाईक यांनी, “स्टे मिळण्यास नक्कीच उशीर झाला. आता बैल गेला आणि झोपा केला, अशी परिस्थिती झाली आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.



  • ‘मला निमंत्रण नव्हते, पण त्याचे काही वाटत नाही’

गडकरी रंगायतन येथे झालेल्या परिवहन विभागाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबाबत विचारले असता नाईक यांनी आपल्याला निमंत्रणच मिळाले नसल्याचे सांगितले.

“माझे OSD आणि PA इथे बसले आहेत. त्यांना विचारा, मला निमंत्रण होते का? मला निमंत्रण नव्हते. पण त्याचे मला काही वाटत नाही. मान देऊन कोणी बोलावले तर आम्ही जातो. तरीही मी राग मानत नाही किंवा नाराज होत नाही,” असे नाईक यांनी स्पष्ट केले.

  • TDR प्रकरणावरून महायुतीत मतभेद

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जमिनीच्या मोबदल्यात एका खासगी कंपनीला मोठ्या प्रमाणावर विकास हस्तांतरण हक्क (TDR) देण्याच्या प्रक्रियेवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून नाईक यांच्या वन विभागावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

या आरोपांना उत्तर देताना नाईक यांनी वन विभाग चुकीच्या गोष्टींच्या विरोधात असल्याचे सांगितले. तसेच TDR प्रकरणाची सविस्तर माहिती मागवली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. TDR आणि बिल्डरांना दिल्या जाणाऱ्या वाढीव FSIच्या मुद्द्यावरून नाईक यांनी यापूर्वीही एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, महायुती सरकारमध्ये दोन्ही नेते एकत्र असतानाही ठाणे आणि नवी मुंबईतील विकासकामांवरून त्यांच्यातील मतभेद आता अधिक तीव्र होताना दिसत आहेत.

Ganesh Naik makes a major revelation; also takes direct aim at the TDR controversy.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात