क्यानी अँड कंपनीसह मुंबईतील अनेक आस्थापनांवर FDAचा छापा; 1.19 कोटींचा अन्नसाठा जप्त

Kyani & Co

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर अन्न आस्थापनांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. २३ ते २७ सप्टेंबरदरम्यान झालेल्या कारवाईत तब्बल ५०,६०१.७८ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत १ कोटी १९ लाख रुपये आहे. या मोहिमेत ३० अन्न परवाने किंवा नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली असून, अनेक आस्थापनांविरोधात गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

FDAच्या कारवाईत मुंबईतील प्रसिद्ध क्यानी अँड कंपनीसह विविध आस्थापनांचा समावेश आहे. मुंबईतील कलबादेवी येथील क्यानी अँड कंपनीच्या तपासणीदरम्यान अन्न तयार करण्याच्या आणि साठवणुकीच्या ठिकाणी मांजरे, उंदरांची विष्ठा, जिवंत माशा आणि मृत झुरळे आढळल्याचा दावा FDAने केला आहे.

तपासणीदरम्यान रेफ्रिजरेटरमध्ये रक्त साचलेले आढळल्याचे, तसेच अन्नप्रक्रिया विभागात उघडे सांडपाण्याचे मॅनहोल असल्याचेही FDAने नमूद केले आहे.

कोलाबा स्वीट मार्टमध्येही अस्वच्छता

मुंबईतील Colaba Sweet Martच्या तपासणीत जिवंत झुरळे, पाल, माशा आणि अळ्या आढळल्याचे FDAने सांगितले. या आस्थापनाकडे आवश्यक कीटक नियंत्रण व्यवस्था नसल्याचे आढळले. कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय फिटनेसच्या नोंदी आणि वैयक्तिक सुरक्षा साधनांचीही कमतरता असल्याचे तपासणीत समोर आले.

धारावीतील Arun Vilas Farsan आणि परळ येथील Ruchi Veg Restaurant यांच्यावरही स्वच्छता आणि आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून, त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

विलेपार्लेतील फास्ट फूड सेंटरवरही कारवाई

विलेपार्ले येथील Daffodils Fast Food Innमध्ये अत्यंत अस्वच्छ परिस्थिती आढळल्याने परवाना निलंबित करण्यात आला. खराब स्थितीतील रेफ्रिजरेशन उपकरणे, तापमान दर्शविणारी यंत्रणा कार्यरत नसणे आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक वस्तूंसोबत अन्नसाठा ठेवण्यात आल्याचे FDAने म्हटले आहे.

लोअर परळ येथील Subway आउटलेट चालविणाऱ्या EverSub India Pvt. Ltd. वरही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान सदोष रेफ्रिजरेटर, बुरशीसदृश थर, दुर्गंधी आणि जिवंत झुरळे आढळल्याची माहिती FDAने दिली.

याशिवाय QSR Brands India, Royal China, Tiffin, United Bakery & Stores, Shree Padmavati Enterprises आणि Hotel Purandar Vilas यांच्याविरोधात अन्न सुरक्षा व मानक कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

पुणे विभागात २८.५४ लाखांचा साठा जप्त

पुणे विभागात ६,३६६.८८ किलो अन्नपदार्थांचा, अंदाजे २८.५४ लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. यात खवा, पनीर, तूप, क्रीम, मिठाई, श्रीखंड, लस्सी, नारळाचे तेल, फरसाण, बटाटा वेफर्स आणि भडंग यांचा समावेश आहे.

यातील काही अन्नपदार्थ निकृष्ट, भेसळयुक्त, असुरक्षित किंवा चुकीच्या लेबलिंगचे असल्याचा संशय FDAने व्यक्त केला आहे.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवरही विशेष लक्ष देण्यात आले. पुण्यात ३८५ किलो खवा आणि १९ किलो व्हाइट बटर जप्त करण्यात आले. तर खेड येथील एका डेअरीमधून ९०९ किलो खवा आणि ३४९ किलो पनीर जप्त करण्यात आले.

कोकण विभागात सर्वाधिक अन्नसाठा जप्त

कोकण विभागात २३,८०६.९० किलो अन्नपदार्थांचा, सुमारे ३९.९९ लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. यात शेव, चिवडा, गाठिया, नमकीन, वेफर्स, खाद्यतेले, मसाले, सुकामेवा, चहा, खवा, सॉस, नूडल्स, कच्चे दूध आणि मिठाईचा समावेश आहे.

ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग परिसरातील विविध आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. Blink Commerce Pvt. Ltd. आणि Foclo Technologies Pvt. Ltd. यांच्यासह सहा आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्यात आले.


‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप


जळगाव, नागपूरसह अन्य विभागांतही धडक कारवाई

जळगावमध्ये ७,७४९.९ किलो अन्नपदार्थांचा सुमारे ४.२८ लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. नागपूर विभागात अस्वच्छ साठवणूक, भेसळ, निकृष्ट दर्जा, लेबलिंगमधील त्रुटी आणि परवान्याशिवाय व्यवसाय केल्याच्या कारणांवरून ३२.७४ लाख रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त किंवा नष्ट करण्यात आल्याचे FDAने सांगितले.

छत्रपती संभाजीनगर, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि अकोला या भागांतही तपासणी आणि कारवाई करण्यात आली.

२२ गुन्हे दाखल; ३० जणांना अटक

FDAने कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातील २६ आस्थापनांची स्वतंत्र तपासणी केली. प्रतिबंधित अन्नपदार्थांची साठवणूक, विक्री आणि वितरण यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत ३०.६३ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला. २२ गुन्हे दाखल करून ३० जणांना अटक करण्यात आली. तीन आस्थापने सील करण्यात आली असून, १४.८० लाख रुपये किमतीची तीन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.

सणासुदीच्या काळात कारवाई आणखी तीव्र

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कालबाह्य, छेडछाड केलेले किंवा अस्वच्छ पद्धतीने तयार केलेले अन्नपदार्थ विकणाऱ्या अथवा साठवणाऱ्या आस्थापनांविरोधात कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सणासुदीच्या काळात मिठाई, दूध व दुग्धजन्य पदार्थ, फरसाण, खाद्यतेल आणि अन्य अन्नपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी FDAकडून तपासणी आणि कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

Action taken against Kyani & Co and several other establishments in Mumbai

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात