विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना मालकी हक्क मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या संस्थांना वार्षिक बाजारमूल्य दरपत्रकाच्या (रेडी रेकनर) केवळ पाच टक्के अधिमूल्य भरून भोगवटादार वर्ग-१ दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे संबंधित गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासह स्वयं-पुनर्विकासाचा मार्ग सुकर होणार असून, हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
वांद्रे येथील उत्तर भारतीय संघ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी निवारा परिषदेअंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वर्ग-१ रूपांतरण आदेशांचे वितरण करण्यात आले. या निर्णयाचा नागरी निवारा परिषदेतील सुमारे ६२ एकर क्षेत्रावरील ११३ सहकारी गृहनिर्माण संस्थांना लाभ होणार आहे. या संस्थांमध्ये एकूण ६ हजार २५० सदनिका असून, सुमारे २५ हजार रहिवासी वास्तव्य करतात. वर्ग-१ दर्जा मिळाल्यामुळे या रहिवाशांना त्यांच्या घरांवर मालकी हक्क प्राप्त होण्याबरोबरच पुनर्विकासातील अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने २०१७-१८ मध्ये कायद्यात बदल करून भाडेपट्ट्यावरील जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्याची व्यवस्था निर्माण केली. सुरुवातीला यासाठी २५ टक्के अधिमूल्य आकारण्यात येत होते. त्यानंतर ते १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले. मात्र, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाची गरज आणि नागरिकांवरील आर्थिक भार लक्षात घेऊन हे अधिमूल्य केवळ पाच टक्के करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने एकमताने मंजूर केला. या निर्णयाचा विशेष फायदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रहिवाशांना होणार आहे.
मुंबईमध्ये स्वयं-पुनर्विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने विविध सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे मुंबईत स्वयं-पुनर्विकासाचे सुमारे १ हजार ६०० प्रस्ताव पुढे आले आहेत. शासकीय जमिनीवरील अन्य सहकारी गृहनिर्माण संस्थांनाही वर्ग-१ रूपांतरणाचा लाभ मिळावा, यासाठी महसूल विभागाने व्यापक मोहीम राबवावी. संबंधित संस्थांच्या परिसरात शिबिरे आयोजित करून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन आणि मदत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
सदनिकाधारकांना मिळणार स्वतंत्र मालमत्ता पत्रक
मुंबईतील उंच इमारती आणि टॉवरमधील प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र मालमत्ता पत्रक देण्याचा निर्णयही राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे प्रत्येक सदनिकेचा मालकी हक्क अधिक स्पष्ट होणार असून, एकाच सदनिकेची एकापेक्षा अधिक व्यक्तींना विक्री करण्यासारख्या गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. मुंबईतील मराठी माणूस मुंबईतच राहिला पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांना चांगले जीवनमान मिळाले पाहिजे, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
‘सक्षम’ अभियानातून युवकांना रोजगाराच्या संधी
तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वांद्रे परिसरात ‘सक्षम’ योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या कौशल्य गणना उपक्रमाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष कौतुक केले. या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांची कौशल्ये आणि रोजगार बाजारपेठेतील गरजा यांची सांगड घालण्याचे काम होत आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांशी युवकांना जोडून देण्याचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. रोजगार बाजारपेठेच्या मागणीनुसार प्रशिक्षण आणि कौशल्यवृद्धीची संधी उपलब्ध करून देणारे हे प्रारूप राज्यातील अन्य भागांतही राबविता येईल, असे त्यांनी सांगितले.
चित्रनगरीसाठी १४ एकर जमीन; मराठी चित्रपटांना सवलतीचे निर्देश
दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या विकासासाठी मानखुर्द येथील १४ एकर अतिक्रमणमुक्त शासकीय जमीन सांस्कृतिक कार्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आली. या जागेवर मराठी चित्रपटांना सवलत देण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांना सूचना केली. तसेच मुंबईला ड्रग्जमुक्त करण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करत, सामूहिक प्रयत्नांतून अमली पदार्थांच्या समस्येवर मात करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
महसूल विभागाकडून पात्र संस्थांसाठी विशेष मोहीम
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेनुसार मुंबईतील नागरिकांना त्यांच्या घरांचा कायदेशीर आणि शाश्वत मालकी हक्क मिळावा, यासाठी शासनाने नियम अधिक सुलभ केले आहेत. पाच टक्के अधिमूल्याच्या निर्णयामुळे नागरी निवारा परिषदेतील कुटुंबांवरील आर्थिक भार कमी होणार असून, घरांच्या पुनर्विकासाला चालना मिळेल. मुंबईतील सर्व पात्र गृहनिर्माण संस्थांपर्यंत ही मोहीम पोहोचविण्यात येईल. सर्वसामान्य नागरिकांची घरे कायदेशीर करून त्यांची मालमत्ता शाश्वत करण्यासाठी महसूल, सहकार आणि नगरविकास विभाग समन्वयाने काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे ६ किलोमीटर काम पूर्ण; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी नागरी निवारा परिषदेतील गृहनिर्माण संस्थांना वर्ग-१ दर्जा मिळणे हा मुंबईच्या सामाजिक इतिहासातील महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे सांगितले. वांद्रे-सांताक्रूझ परिसरात राबविण्यात आलेल्या ‘सक्षम’ कौशल्य गणना उपक्रमांतर्गत सुमारे ३१ हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, ३ हजार ५०० युवकांना रोजगाराच्या संधींशी जोडण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
६० एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त
मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने विशेष मोहिमेद्वारे आतापर्यंत सुमारे ६० एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त केली आहे. या जमिनींचा सार्वजनिक प्रकल्प आणि शासकीय कामांसाठी उपयोग करण्यात येणार आहे. यापैकी १४ एकर जमीन चित्रनगरीच्या विकासासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी प्रास्ताविकात नागरी निवारा परिषदेतील गृहनिर्माण संस्थांचे वर्ग-१ रूपांतरण, चित्रनगरीसाठी जागा, ड्रग्ज फ्री मुंबई उपक्रम आणि ‘सक्षम’ कौशल्य गणना अभियानाची माहिती दिली. कौशल्य विकास अभियानांतर्गत ३१ हजार ५६९ उमेदवारांना करिअर मार्गदर्शन देण्यात आले असून, ३ हजार ४४९ युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यापैकी १ हजार १२८ उमेदवारांनी नोकरी स्वीकारली आहे. या कौशल्य सर्वेक्षणाचे प्रारूप अनेक जिल्ह्यांनी स्वीकारले असल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय मुंबईतील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ३ हजार १०८ समुपदेशन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून ५३८ समुपदेशक कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत ३३० समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार रवींद्र वायकर, आमदार प्रवीण दरेकर, सुनील प्रभू, मुरजी पटेल, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच नागरी निवारा परिषदेअंतर्गत गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या कामाचे कौतुक केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App