विशेष प्रतिनिधी
जालना: कथित ₹500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिवसेना नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या आरोपांना मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी (27 नोव्हेंबर) जालना येथे माध्यमांशी बोलताना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “मी कोणाची तरी सुपारी घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करत असल्याचे योगेश कदम म्हणतात; पण योगेश कदमजी, सुपाऱ्या तुम्ही घ्यायला लागलात, आम्ही नाही!” असे म्हणत जरांगे पाटलांनी कदम पिता-पुत्रांवर गंभीर आरोप केले आहेत.
तसेच, माझ्या पत्रकार परिषदेच्या दोन दिवस आधीच रामदास कदम यांच्याकडे ती ऑडिओ क्लिप आली होती आणि त्यांनी कांदिवलीतून एकनाथ शिंदे यांचे विश्वासू असलेल्या ‘जोशी’ नामक व्यक्तीला फोन केला होता, असा गौप्यस्फोट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांचे कॉल डिटेल्स (CDR) काढावेत, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे ६ किलोमीटर काम पूर्ण; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा
‘जोशी’ नामक व्यक्तीला केलेल्या फोनवरून रामदास कदमांना थेट आव्हान
ऑडिओ क्लिप आपल्याकडे पत्रकार परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आली आणि जरांगे खोटे बोलत आहेत, या रामदास कदम यांच्या दाव्याचे जरांगे पाटील यांनी खंडन केले.
जरांगे पाटील यांनी सांगितले की, त्यांच्या पत्रकार परिषदेच्या दोन दिवस आधीच रामदास कदम यांच्या कांदिवली येथील घरी किंवा कार्यालयात ही क्लिप पोहोचली होती; त्यावेळी कदम यांनी ‘जोशी’ नामक व्यक्तीला फोन करून “शिंदे साहेबांना ही क्लिप पाहिजे का, मी पाठवतो” अशी विचारणा केली होती, ज्यावर समोरून “आमच्याकडे ही क्लिप कालच आली आहे” असे उत्तर मिळाले होते.
टीव्हीवर बातम्या सुरू असताना फोनची गरज काय?
जर रामदास कदम यांच्या दाव्यानुसार दुसऱ्या दिवशी क्लिप आली असती, तर तोपर्यंत ती सर्व टीव्ही चॅनेलवर प्रसारित झाली होती; मग टीव्हीवर बातम्या सुरू असताना जोशी यांना फोन करण्याची गरजच काय होती, असा सवाल जरांगे यांनी विचारला.
पुरावे उघड करण्याचा इशारा
रामदास कदम यांनी जोशी यांना फोन केला नव्हता हे जाहीर करावे आणि एकनाथ शिंदे यांनी पुरावे मागितल्यास आपण तात्काळ पत्रकार परिषद घेऊन सर्व पुरावे जनतेसमोर ठेवू; यामुळे कदम यांच्या घरातील कोणी माहिती फोडली याचा त्यांना धक्का बसेल आणि एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचेही डोळे उघडतील, असा दावा जरांगे पाटील यांनी केला.
मंत्रिपदाचा वापर समाजाविरोधात होत असल्याचा योगेश कदमांवर आरोप
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला एकनाथ शिंदे यांना बदनाम करायचे असते तर गरीब मराठ्यांनी जीवाचे रान करून त्यांना एवढ्या उंचीवर नेले नसते; मात्र मंत्रिपद मिळाल्यापासून तुम्हीच मराठा समाजाची प्रमाणपत्रे रद्द करणे, तरुणांवर एमपीडीए (MPDA) व खोटे गुन्हे दाखल करणे आणि आमचे समन्वयक फोडून त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावणे असे प्रकार सुरू केले आहेत.
शिंदे साहेबांचे काही मंत्री, आमदार आणि प्रवक्ते त्यांना चुकीचे मार्गदर्शन करून त्यांच्याच पायावर धोंडा पाडत असून, उद्या 2019 सारखी परिस्थिती ओढवली तर त्याला आम्ही मराठे नव्हे तर तुम्हीच जबाबदार असाल, असा इशारा देत जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून रामदास कदम व जोशी यांचे कॉल डिटेल्स काढण्याची विनंती केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App