20 प्रशासकीय विभागांची जबाबदारी निश्चित; 6 प्रमुख स्तंभ, 21 कृती मुद्दे आणि 40 निकषांवर जिल्ह्यांचे मूल्यमापन होणार
मुंबई : राज्यातील अमली पदार्थांचे वाढते जाळे उद्ध्वस्त करून महाराष्ट्राला नशामुक्त करण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी जिल्हास्तरीय नार्को समन्वय समितीच्या बैठकीत ‘नशामुक्त महाराष्ट्र – लक्ष्यवेध 1.0’ या अभियानाचा शुभारंभ केला. या अभियानाच्या माध्यमातून अमली पदार्थांची निर्मिती, तस्करी आणि वितरणाची साखळी मोडून काढण्यासोबतच तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
अमली पदार्थांविरोधातील लढा केवळ पोलीस विभागापुरता मर्यादित न ठेवता सरकारच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. ‘होल ऑफ गव्हर्नमेंट’ दृष्टिकोनातून सर्व विभागांनी आपापली जबाबदारी पार पाडावी. अमली पदार्थांची वाढती परिसंस्था समूळ नष्ट करणे हे राज्य सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
14 ते 24 वयोगटातील तरुण ड्रग्जच्या जाळ्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. विशेषतः 14 ते 24 वयोगटातील तरुणांचा अमली पदार्थांच्या सेवनासाठी तसेच वितरणाच्या साखळीत वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. अल्प पैशांचे आमिष दाखवून तरुणांना या अवैध व्यवसायात ओढले जात आहे.
अमली पदार्थांची निर्मिती करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता नसल्याने जुन्या कारखान्यांमध्ये, घरांमध्ये किंवा छोट्या जागांमध्येही त्यांचे उत्पादन केले जात असल्याचे आढळते. या अवैध व्यवसायात मोठ्या प्रमाणावर पैसा असल्याने विविध यंत्रणांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न होतात. त्यामुळे या समस्येकडे केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
20 विभागांची जबाबदारी, 21 कृती मुद्दे निश्चित
अमली पदार्थांविरोधातील मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील 20 प्रशासकीय विभागांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तसेच सहा प्रमुख स्तंभांवर आधारित 21 कृती मुद्दे निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय एनसीओआरडी (NCORD) समित्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी 40 निकष आणि एकूण 650 गुणांची ‘परफॉर्मन्स मॅट्रिक्स फॉर डिस्ट्रिक्ट एनसीओआरडी’ तयार करण्यात आली आहे.
या निकषांच्या आधारे प्रत्येक जिल्ह्याच्या कामगिरीचे नियमित मूल्यमापन केले जाणार आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या यंत्रणांच्या त्रुटी दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. या मोहिमेत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
केवळ कारवाई नव्हे, तर जनजागृतीवरही भर
अमली पदार्थांविरोधातील लढाई केवळ पोलिसांच्या माध्यमातून यशस्वी होऊ शकत नाही. त्यासाठी पुरवठा साखळीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच अमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठीही व्यापक उपाययोजना करणे आवश्यक आहे. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन आणि जीएसटी विभागाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थी व तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रभावी व्यसनमुक्ती केंद्रांची उभारणी आणि योग्य व्यवस्थापन करण्यावरही भर देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.
पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश
अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांबाबत माहिती वेळेत मिळणे आणि त्यावर तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे. पोलीस विभागाने समाजाचे डोळे आणि कान म्हणून काम करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधीनस्थ यंत्रणांशी नियमित संवाद ठेवावा. कारवाईसाठी आवश्यक प्रशासकीय व नैतिक अधिकारांचा प्रभावी वापर करावा. पोलीस महासंचालकांनी विभागांतर्गत दिलेल्या सूचना आणि निश्चित केलेल्या कार्यपद्धतीची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
‘पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणे ही सामूहिक जबाबदारी’
अमली पदार्थांविरोधातील ही लढाई केवळ एका विभागाची नसून आपल्या मुलांच्या, पुढील पिढ्यांच्या आणि संपूर्ण समाजाच्या भवितव्याशी संबंधित आहे. त्यामुळे सर्व विभागांनी गांभीर्याने आणि पूर्ण क्षमतेने या मोहिमेत सहभागी व्हावे. निश्चित केलेल्या मूल्यमापन निकषांचा वापर करून प्रत्येक जिल्ह्याने सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
या बैठकीला राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App