विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: संसदेच्या विशेष अधिवेशनात येऊ घातलेल्या महिला आरक्षण व डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांवरून सुरू असलेल्या राजकीय गदारोळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी (28 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या मते, विधेयकाला पाठिंबा देणे हे देशहिताचे काम असून त्यात कोणतेही राजकारण नाही; मात्र ‘एनडीए’मध्ये (NDA) सामील होण्यासाठी अधिकृत पत्र द्यावे लागते. ज्या दिवशी शरद पवार किंवा सुप्रिया सुळे एनडीएत सामील होण्याचे अधिकृत पत्र देतील, त्यानंतरच मंत्रिपदांच्या चर्चांवर बोलता येईल, असे पटेल यांनी स्पष्ट केले.
डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचे स्वागत; काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर
प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि विरोधकांच्या टीकेवर खालील मुद्दे मांडले:
डिलिमिटेशन ही नियमित प्रक्रिया: डिलिमिटेशन ही काही नवीन गोष्ट नसून दर 15 वर्षांनी मतदारसंघांची पुनर्रचना होत आली आहे; आपण स्वतः गोंदिया-भंडारा मतदारसंघाचे खासदार असताना मतदारसंघाच्या सीमा नव्याने आखल्या गेल्या होत्या, अशी आठवण पटेल यांनी सांगितली. वाढत्या शहरीकरणानुसार प्रत्येक नागरिकाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे या भावनेतून हे विधेयक आणले असून, महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमतीने घेतला आहे; या विधेयकाला शरद पवार यांचा पक्ष आणि डीएमके (DMK) पाठिंबा देत असतील तर त्याचे स्वागतच आहे, असे पटेल म्हणाले.
मुंबईतील २५ हजार रहिवाशांचा घरांचा प्रश्न मार्गी लागणार! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; आता मिळणार मालकी हक्क
विजय वडेट्टीवारांच्या टीकेला इतिहासाचा दाखला: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या ‘पाठीत खंजीर खुपसण्याच्या’ टीकेवर बोलताना पटेल यांनी 1999 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेची आठवण करून दिली; तेव्हाही काँग्रेसने संधीसाधू आणि पाठीत खंजीर खुपसला अशीच टीका केली होती, असे सांगत राजकारणात योग्य वेळी योग्य भूमिका घेतल्यावर काहीजण टीका करतातच, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
‘शरद पवार हे माझे नेते नेहमीच राहतील’; एनडीए प्रवेशासाठी अधिकृत पत्राची अट
काही दिवसांपूर्वी रुग्णालयात शरद पवार यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणावर भाष्य करताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, राजकीय भूमिका थोडी इकडे-तिकडे झाली असली तरी शरद पवार हे माझे नेते कालही होते, आजही आहेत आणि नेहमीच राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात चांगले काम करत असल्याने आपणही एनडीएची भूमिका घ्यावी, अशी सूचना आपण पवार साहेबांना यापूर्वीच अनेकदा केली होती आणि आता त्या दिशेने त्यांची पावले पडत असतील तर त्याचे स्वागत केले पाहिजे, असे पटेल यांनी नमूद केले.
मात्र, शरद पवार गटाला एनडीएमध्ये 2 मंत्रिपदे मिळणार का या प्रश्नावर पटेल यांनी सावध पवित्रा घेतला. ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या बैठकीला शरद पवार गटाचे प्रतिनिधी म्हणून खासदार नीलेश लंके उपस्थित राहणार असल्याच्या बातम्यांचा संदर्भ देत पटेल म्हणाले की, जसे अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष व विधिमंडळ नेते म्हणून पत्र दिले आणि आपण दिल्लीत संसदेत पत्र दिले, तसेच शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याकडून एनडीएत सामील होण्याचे अधिकृत पत्र आल्यानंतरच मंत्रिपदांच्या चर्चेवर बोलणे उचित ठरेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App