विशेष प्रतिनिधी
ठाणे : मुंब्राच्या नामांतराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुंब्राला ‘मुंब्रादेवी’ असे संबोधण्याचे आवाहन केले आहे. रविवारी मुंब्रा येथे आयोजित कावड यात्रेत सहभागी होताना राणे यांनी स्थानिक हिंदू समाजाला निर्भयपणे राहण्याचे आवाहन केले. तसेच हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले. Nitesh Rane
कावड यात्रेदरम्यान उपस्थितांना संबोधित करताना नितेश राणे म्हणाले, “आजपासून कोणीही मुंब्रा म्हणायचे नाही, मुंब्रादेवी म्हणायचे. मुंब्रा ही महादेवाची भूमी आहे.” परिसरातील हिंदूंनी कोणाच्याही दबावाला किंवा भीतीला बळी पडून आपली घरे अथवा परिसर सोडण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘अडचण आली तर एका तासात तुमच्यासाठी उभा राहीन’
मुंब्रातील हिंदू समाजाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली. “कोणीही तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला, तर नितेश राणे एका तासात तुमच्यासाठी इथे येऊन उभा राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार हिंदू समाजाच्या पाठीशी आहे,” असे ते म्हणाले.
मुंब्रा परिसरात हिंदूंची संख्या वाढली पाहिजे आणि अधिकाधिक हिंदूंनी येथे वास्तव्यास राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. “मुंब्रा कालही भगवा होता, आजही आहे आणि पुढेही भगवाच राहील,” असा दावा राणे यांनी केला.
यापूर्वीही केली होती नामांतराची मागणी
मुंब्राचे नाव बदलून ‘मुंब्रादेवी’ करण्याची मागणी नितेश राणे यांनी यापूर्वीही केली आहे. एप्रिल महिन्यात मुंब्रा येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही मागणी केली होती. इस्लामपूरचे ईश्वरपूर असे नामांतर झाल्याचा दाखला देत भविष्यात मुंब्राचेही नामांतर केले जाईल, असा दावा त्यांनी त्यावेळी केला होता.
अबू आझमींचा विरोध
दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी राणे यांच्या नामांतराच्या मागणीला विरोध केला आहे. परिसराचे नाव बदलण्यापेक्षा मुंब्रातील रस्ते, शाळा, महाविद्यालये आणि मूलभूत नागरी सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनीही नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. राणे आपल्या खात्याशी संबंधित प्रश्नांवर बोलण्याऐवजी चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.
नितेश राणे यांच्या ताज्या वक्तव्यामुळे मुंब्राच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App