विशेष प्रतिनिधी
बारामती : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर होणारी ही महत्त्वाची सहकार निवडणूक असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून स्वतंत्र पॅनेलची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. अशातच निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. Someshwar
मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ येथे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला सुप्रिया सुळे, पार्थ पवार, जय पवार आणि युगेंद्र पवार उपस्थित असल्याचे वृत्त आहे. या बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
२१ जागांसाठी ५१४ उमेदवार
सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळातील २१ जागांसाठी ५१४ उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत. सुरुवातीला एकूण ६०१ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. छाननीनंतर पात्र अर्जांची संख्या ५५६ झाली, तर त्यानंतर ४५ अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे आता ५१४ उमेदवार मैदानात आहेत.
‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ आहे. त्यामुळे तोपर्यंत विविध गटांमध्ये पॅनेलची बांधणी आणि संभाव्य आघाड्यांबाबतच्या हालचालींना वेग येणार आहे.
युगेंद्र पवार विरुद्ध सुनेत्रा पवार?
अजित पवार यांच्या निधनानंतर सोमेश्वर कारखान्याची निवडणूक पवार कुटुंबातील राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या गटाकडूनही उमेदवारांची चाचपणी आणि गाठीभेटी सुरू आहेत.
याशिवाय भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडूनही निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीचे राजकीय चित्र अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.
बिनविरोधाची चर्चा प्रत्यक्षात येणार?
सोमेश्वरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चर्चांना सुरुवात झाली असली, तरी प्रत्यक्षात किती उमेदवार अर्ज मागे घेतात आणि कोणते पॅनेल अंतिम मैदानात उतरतात, हे ३० सप्टेंबरनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सिल्व्हर ओकवरील बैठकीनंतर सुरू झालेल्या बिनविरोधाच्या चर्चेला अंतिम स्वरूप येते का, याकडे बारामतीसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सध्याच्या निवडणूक कार्यक्रमानुसार ११ ऑक्टोबरला मतदान आणि १२ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App