MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! 7 जणांना जेल, ‘या’ आरोपीचा शोध सुरू

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या सातही आरोपींची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सोमवारी सर्व आरोपींना मुंबई सत्र न्यायालयात रिमांडसाठी हजर करण्यात आले. मात्र, पोलिसांनी त्यांच्या कोठडीत वाढ मागितली नाही. त्यामुळे न्यायालयाने सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.

या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत MPSCचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे, सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेवर नखाते, तसेच परीक्षार्थी ऋतुजा पाटील, तिचे वडील अमृत पाटील आणि कथित मध्यस्थ प्रवीण पाटील यांच्यासह सात जणांना अटक केली आहे. MPSC paper leak case

आठवा आरोपी अद्याप फरार

दरम्यान, या प्रकरणातील आठवा आरोपी मयुर ठाकरे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यापासून मयुर ठाकरे फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथक तैनात केले असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मयुर ठाकरेची या प्रकरणात महत्त्वाची भूमिका होती. त्याने अमृत पाटील आणि प्रवीण पाटील यांची ओळख करून दिल्याचा आरोप आहे. तसेच पेपर मिळवून देण्यासाठी त्याने मध्यस्थी केल्याचे तपासात समोर आले आहे.

ऋतुजा पाटील आणि तिचा मित्र गौरव पाटील उर्फ लोकेश यांच्यात झालेल्या तब्बल 270 पानी संभाषणात मयुर ठाकरेचा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. या संभाषणातून मयुरसोबत आर्थिक व्यवहार झाल्याची माहितीही तपास यंत्रणेला मिळाली आहे.

मुलीसाठी 12 लाखांत पेपर खरेदी केल्याचा आरोप

या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेले अमृत पाटील हे नंदुरबार जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आहेत. त्यांना यापूर्वी राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र, आपल्या मुलीला MPSC परीक्षेत यश मिळावे यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून प्रश्नपत्रिका मिळवल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, अमृत पाटील यांनी कथितरित्या 12 लाख रुपयांना पेपर खरेदी केला असून, त्यापैकी 5 लाख रुपये संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ‘कौटिल्य अकादमी’शी संबंधित प्रवीण पाटीलच्या मदतीने 22 मार्च 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेच्या दोन दिवस आधी ऋतुजासाठी प्रश्नपत्रिका मिळवण्यात आल्याचा आरोप आहे.



ऋतुजाने हा पेपर तिचा मित्र गौरव पाटील उर्फ लोकेश यालाही दिल्याचे तपासात समोर आले. निकालानंतर ऋतुजा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली, तर गौरव अपात्र ठरला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ऋतुजा अधिकारी झाल्यानंतर आपल्यापासून दूर जाईल, तसेच तिने लग्नाला नकार दिल्याच्या रागातून गौरवने MPSCकडे पेपरफुटीची तक्रार केल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, तक्रार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने ती खोटी असल्याचे सांगत तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत प्रकरण पोलिसांच्या तपासात गेले होते.

औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी MPSCमार्फत घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. 22 मार्च 2026 रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी केली.

या चौकशीत एका उमेदवाराला परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका मिळाल्याचे निष्पन्न झाल्याने आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या पदासाठी फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.

फेरपरीक्षेसाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून, त्यांच्याकडून कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. फेरपरीक्षेची तारीख स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान, आठवा आरोपी मयुर ठाकरे अद्याप फरार असल्याने त्याचा शोध आणि या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPSC paper leak case: Accused sent to judicial custody, hunt on for eighth accused

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात