विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद अखेर रद्द करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीमध्ये त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांच्या पदावर अपात्रतेची टांगती तलवार होती. या निर्णयाला त्यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाकडूनही त्यांना दिलासा मिळाला नाही.Vishakha Raut
त्यानंतर त्यांच्या नगरसेवक पदाच्या रद्दबातलतेची केवळ औपचारिक घोषणा बाकी होती. अखेर सोमवार, 7 सप्टेंबर रोजी मुंबई महापालिकेच्या महासभेत महापौर रितू तावडे यांनी विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा केली.
विशाखा राऊत या मुंबई महानगरपालिकेतील अनुभवी नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. त्यानंतर मुंबई महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारशी पत्रव्यवहार करत त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती.
या कारवाईला विशाखा राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर महापालिकेच्या चिटणीस विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव महापौरांसमोर मांडला आणि महासभेत पद रद्द झाल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली.
विशाखा राऊत या दादरमधील वॉर्ड क्रमांक 191 मधून ओबीसी महिला राखीव जागेवर निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत त्यांची लढत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांच्याशी झाली होती. विशाखा राऊत यांना 13 हजार 326, तर प्रिया सरवणकर यांना 13 हजार 39 मते मिळाली होती. अवघ्या 197 मतांनी राऊत यांनी विजय मिळवला होता.
दरम्यान, विशाखा राऊत यांचे पद रद्द झाल्यानंतर मुंबई महापालिकेचे सभागृह नेते आणि भाजपचे गटनेते गणेश खणकर यांनी प्रतिक्रिया दिली. “जे झालं ते कायदेशीर झालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अजून असे कित्येक धक्के पाहायचे आहेत,” असा दावा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
विशाखा राऊतांचा गंभीर आरोप
नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर विशाखा राऊत यांनी या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. “आयुक्तांनी मला अपात्र ठरवण्याचे अत्यंत तत्परतेने काम केले. आयुक्तांनी नगरविकास खात्याला पत्र लिहिले. हे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे,” असा आरोप राऊत यांनी केला.
मुंबई महापालिका स्वायत्त संस्था असताना आपल्या अपात्रतेसाठी नगरविकास विभागाकडे विचारणा का करण्यात आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“नगरविकास विभागाकडे मुंबई महापालिकेचे कित्येक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांची उत्तरं आजवर दिली नाहीत. मात्र, विशाखा राऊत यांना अपात्र करायचं की नाही, याचं उत्तर मात्र पटकन देण्यात आलं,” असा दावा राऊत यांनी केला.
आपल्याला अपात्र करण्याचा निर्णय आधीच ठरवण्यात आला होता, असा खळबळजनक आरोपही विशाखा राऊत यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या नगरसेवक पदाच्या रद्दबातलतेवरून मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App