विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन, संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील ९ गुणवंत शिक्षकांचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ने गौरव करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. Nine teachers
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, उच्च शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. देशभरातील ४८ शालेय शिक्षक, २१ उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि १३ कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षक, अशा एकूण ८२ शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला. पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, पदक आणि ५० हजार रुपयांचा रोख पुरस्कार देण्यात आला.
यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार, कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्यासह केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘शिक्षकांचा सन्मान हा प्रगत समाजाचा पाया’
पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाहीत, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला, चारित्र्याला आणि विचारांना आकार देत सशक्त राष्ट्राची पायाभरणी करतात, असे त्यांनी सांगितले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचे स्मरण करताना राष्ट्रपतींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रवींद्रनाथ टागोर आणि गोपाळबंधू दास यांच्या शैक्षणिक योगदानाचाही गौरव केला. देशातील दुर्गम आणि ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या शिक्षकांच्या समर्पणाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
भारताला जगाची ज्ञान आणि कौशल्याची राजधानी बनवण्यासाठी प्राथमिक स्तरापासूनच तंत्रज्ञान, नैतिक मूल्ये आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्रातील कोणत्या ९ शिक्षकांचा सन्मान?
शालेय शिक्षण क्षेत्रातील शिक्षक :
डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे – बीड : ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २९ वर्षांपासून कार्य. ‘पालक रक्षक’ आणि ‘शिक्षण आपल्या दारी’ यांसारखे उपक्रम. कुंदा जयवंत बच्छाव – नाशिक : महापालिका शाळांमध्ये डिजिटल अध्यापन, यंत्रमानव आणि सहाय्यक तंत्रज्ञानाचा वापर करून वंचित विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाशी जोडले. वैभव वसंतराव कुलकर्णी – लातूर : खेळणी, कला आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणित सोपे व आनंददायी करून दिले. शिवप्रसाद अरविंद टिंगरे – सातारा : प्रत्यक्ष प्रयोग, कमी खर्चातील प्रयोगसाधने आणि डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला.
उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षक :
डॉ. विक्रम विशाल – IIT मुंबई : कार्बन पकड व साठवणूक आणि अपारंपरिक हायड्रोकार्बन प्रणालींवर महत्त्वपूर्ण संशोधन. डॉ. अमर मोहनराव ताकसांडे – वर्धा : वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि ग्रामीण बालआरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान. डॉ. संदीपान प्रल्हाद नरोटे – सोलापूर : प्रतिमा प्रक्रिया, जैवमिती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन व अभ्यासक्रम विकास.
कौशल्य विकास व उद्योजकता क्षेत्रातील शिक्षक :
किरण प्रकाश झारकर – धाराशिव : डिजिटल शिक्षण, संगणकाधारित प्रशिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षणाची सांगड घालत विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढवली. अर्चना राकेश जाधव – त्र्यंबकेश्वर, नाशिक : आदिवासी आणि ग्रामीण भागातील युवतींना वस्त्ररचना, शिवणकाम आणि फॅशन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देत स्वावलंबनाच्या संधी निर्माण केल्या. शिक्षण क्षेत्रातील महाराष्ट्राचा गौरव
वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यापासून ते आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि रोजगाराभिमुख कौशल्यनिर्मितीपर्यंत विविध क्षेत्रांत केलेल्या कामाची दखल घेत महाराष्ट्रातील या ९ शिक्षकांना राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राच्या योगदानाला देशपातळीवर नवी ओळख मिळाली आहे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App