दिशा सालियन मृत्यू प्रकरणात हायकोर्टाचा मोठा आदेश; CBI करणार तपास, निकालानंतर वडील भावूक

विशेष प्रतिनिधी

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (2 सप्टेंबर 2026) महत्त्वाचा आदेश दिला. या प्रकरणाचा पुढील तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवून त्यानुसार भारतीय न्याय संहितेअंतर्गत (BNS) गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

गेल्या शुक्रवारी या प्रकरणातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. बुधवारी न्यायालयाने आपला निर्णय जाहीर करत CBI तपासाचा मार्ग मोकळा केला.

सहा वर्षांपासून निकालाची प्रतीक्षा

8 जून 2020 रोजी दिशा सालियन यांचा मालाड येथील राहत्या इमारतीतून पडून मृत्यू झाला होता. दिशा यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्यासोबतही काही काळ काम केले होते. त्यांच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी तपास करत हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे म्हटले होते.

मात्र, दिशा यांचे वडील सतीश सालियन यांनी या निष्कर्षावर प्रश्न उपस्थित केले. मार्च 2025 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.



निकालानंतर सतीश सालियन भावूक

हायकोर्टाच्या आदेशानंतर सतीश सालियन यांनी न्यायालयाचे आभार मानले. माध्यमांशी बोलताना ते भावूक झाले. गेल्या सहा वर्षांपासून या निर्णयाची प्रतीक्षा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

“मी गेल्या सहा वर्षांपासून या निकालाची वाट पाहत होतो. मी माझ्या मुलीला गमावलं आहे. माझ्याकडे बोलण्यासाठी काहीही नाही. मी कोर्टाचे आभार मानतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

न्यायालयाचा निर्णय ऐकल्यानंतर आपण न्यायाधीशांसमोर हात जोडून आभार मानल्याचेही त्यांनी सांगितले. या लढ्यात अनेकांनी मेहनत घेतल्याचे नमूद करत आज आपल्याला काहीसा दिलासा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

CBI तपासाबाबत कोर्टाने काय निर्देश दिले?

मुंबई उच्च न्यायालयाने CBI अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. तपासासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास सांगण्यात आले असून, मालवणी पोलीस ठाण्यातील या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि तपासातील माहिती CBIकडे सोपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच सतीश सालियन यांचा जबाब नोंदवून त्यानुसार BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने सांगितले आहे. तपासादरम्यान ज्या व्यक्तीविरुद्ध पुरावे समोर येतील, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. मात्र, ज्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा उपलब्ध होणार नाही, त्यांना केवळ संशयाच्या आधारावर आरोपी करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

CBIचा अहवाल नकारात्मक आल्यास काय?

CBIने तपास पूर्ण केल्यानंतर नकारात्मक अहवाल सादर केला, तरी दिशा सालियन यांचे वडील त्यावर आक्षेप घेऊ शकतात. त्यांना प्रोटेस्ट पिटिशन दाखल करण्याचा अधिकार असेल, हेही न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आता दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या तपासाची दिशा बदलली असून, CBIच्या तपासातून नेमके काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

High Court’s major order in the Disha Salian death case.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात