विशेष प्रतिनिधी
नागपूर : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून राज्यभरात गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. मात्र, याचवेळी ध्वनिप्रदूषणाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. पुण्यानंतर आता नागपुरातही ‘डीजे’ आणि ‘लेझर लाईट’मुक्त गणेशोत्सवाची मागणी जोर धरू लागली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. Ganeshotsav
पुणे महापालिकेच्या गणेशोत्सव पूर्वतयारी बैठकीत नारायण पेठेतील रहिवासी विद्यानंद बापट यांनी ‘डीजे’मुक्त आणि ध्वनिप्रदूषणमुक्त गणेशोत्सवाची मागणी केली होती. या मागणीला पुण्यात मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता नागपुरातही अशाच प्रकारची जनचळवळ उभी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
‘डीजे’च्या कर्णकर्कश आवाजासह लेझर लाईटवरही आक्षेप
गणेशोत्सवातील मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात वाजणाऱ्या ‘डीजे’मुळे ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर मिरवणुकीमध्ये वापरण्यात येणाऱ्या लेझर लाईट्समुळे डोळ्यांना धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर संदीप जोशी यांनी ‘डीजे’ आणि लेझर लाईटच्या वापराला विरोध दर्शवला आहे. नागरिकांची भूमिका जाणून घेण्यासाठी ‘सिटीझन पिटीशन’च्या माध्यमातून स्वाक्षऱ्या घेण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. या स्वाक्षऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांची भावना प्रशासनासमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
गणेशोत्सवाला विरोध नाही, पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन
संदीप जोशी यांनी त्यांच्या संपर्कातील गणेशोत्सव मंडळांमध्ये ‘डीजे’ आणि ‘लेझर लाईट’चा वापर केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या संपर्कातील गणेश मंडळांना याबाबत आवाहन करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
गणेशोत्सव साजरा करण्यास कोणताही विरोध नसून उत्सव पारंपरिक आणि आनंददायी पद्धतीने साजरा करण्यावर भर असावा, असे त्यांनी म्हटले आहे. यासाठी बँड, ढोल-ताशे, संदल आणि भजन यांसारख्या पारंपरिक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन संदीप जोशी यांनी केले आहे.
पुण्यानंतर आता नागपुरातही ‘डीजे’मुक्त गणेशोत्सवाची मागणी पुढे आल्याने आगामी काळात या भूमिकेला नागरिकांचा आणि गणेशोत्सव मंडळांचा किती प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App