विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापलेले असतानाच ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. ओबीसी नेत्यांच्या कुटुंबातील विवाहसंबंधांचा उल्लेख करत त्यांनी मराठा समाजातील तरुणींविषयी केलेल्या वक्तव्यावरून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध करत मराठा समाजातील महिलांनी विविध ठिकाणी आंदोलन सुरू केले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
वाघमारे यांनी एका भाषणादरम्यान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुटुंबातील विवाहसंबंधांचा संदर्भ देत ओबीसी नेत्यांच्या घरातील मराठा समाजातील महिलांच्या नातेसंबंधांवर भाष्य केले. ओबीसी नेत्यांची मुले, त्यांची आर्थिक परिस्थिती आणि मराठा समाजातील तरुणी याबाबत त्यांनी आक्षेपार्ह स्वरूपाचे वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे.
‘मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी’
वाघमारे म्हणाले की, अनेक ओबीसी नेत्यांच्या कुटुंबांमध्ये मराठा समाजातील मुलींचे विवाह झाले आहेत. त्यामुळे संबंधित मंत्र्यांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करावी. “तुम्ही आता मराठा विचाराचे झाला असाल, तर ते जाहीर करा आणि ओबीसींच्या प्रश्नांपासून बाजूला व्हा,” अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले.
ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आपला लढा सुरूच राहणार असल्याचे सांगत, संबंधित मंत्र्यांना जाब विचारणार असल्याचेही वाघमारे यांनी म्हटले.
वक्तव्याविरोधात मराठा महिलांचा आक्रमक पवित्रा
वाघमारे यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ आणि त्यातील वक्तव्यांवरून सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठा समाजातील महिलांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला असून, वाघमारे यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
नांदेडमध्ये महिलांचा मोर्चा
नांदेडमध्ये सकल मराठा समाजाच्या महिलांनी वाघमारे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला. मनोज जरांगे पाटील यांच्यावरील राजकीय विरोधातून महिलांना या वादात ओढले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
यावेळी आंदोलक महिलांनी वाघमारे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच ते नांदेडमध्ये आले, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
माढ्यातही निषेध
सोलापूर जिल्ह्यातील माढा येथेही मराठा समाजाच्या वतीने वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आंदोलकांनी घोषणाबाजी करत वाघमारे यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना आता वाघमारे यांच्या वक्तव्यामुळे मराठा-ओबीसी वादाला आणखी धार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App