नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा सस्पेन्स संपला; गिरीश महाजनांची अधिकृत नियुक्ती, भुजबळ-भुसे वेटिंगवर!

विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राज्य शासनाने नाशिकच्या पालकमंत्रिपदाची अधिकृत घोषणा केली असून, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक असलेले मंत्री छगन भुजबळ आणि दादा भुसे यांना अखेर बाजूला करण्यात आले आहे.

नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी महायुतीतील तिन्ही घटक पक्षांकडून दावेदारी करण्यात आली होती. शिवसेनेकडून दादा भुसे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ, तर भाजपकडून गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा होती. या दावेदारीमुळे महायुतीमध्ये निर्माण झालेला तिढा बराच काळ कायम होता.

आधीच मिळाले होते निर्णयाचे संकेत

नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबला असतानाच काही दिवसांपूर्वी सिंहस्थ कुंभपर्वाच्या पुस्तिकेत गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ध्वजारोहणाचा मानही महाजन यांना मिळाला. त्यामुळे नाशिकची जबाबदारी महाजन यांच्याकडेच जाणार असल्याचे संकेत मिळाले होते. आता शासनाच्या अधिकृत घोषणेमुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

यासोबतच रायगडच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे भरत गोगावले यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे मोठे आव्हान

गिरीश महाजन यांच्यासमोर आता नाशिकच्या विकासकामांसह आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांसह विविध पायाभूत प्रकल्पांवर काम सुरू आहे.

मात्र, शहरातील अनेक भागांत सुरू असलेली खोदकामे आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांकडूनही सरकार आणि गिरीश महाजन यांच्यावर टीका होत आहे. त्यामुळे आगामी काळात विकासकामांना गती देण्याबरोबरच कुंभमेळ्याची तयारी वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी महाजन यांच्यावर असणार आहे.

भुजबळ-भुसेंची पुढची भूमिका काय?

पालकमंत्रिपदाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर आता छगन भुजबळ आणि दादा भुसे यांची पुढील भूमिका काय असणार, याकडे नाशिकच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

छगन भुजबळ यांनी यापूर्वी समर्थकांना त्यांच्या समर्थनार्थ लावलेले फलक काढण्याच्या सूचना देत तुलनेने संयमी भूमिका घेतली होती. मात्र, आता अधिकृत निर्णय झाल्यानंतर भुजबळ आणि भुसे या दोन्ही नेत्यांकडून कोणती प्रतिक्रिया येते, याची उत्सुकता आहे.

नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला असला तरी या निर्णयाचे महायुतीच्या स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

The suspense over the post of Nashik’s Guardian Minister has ended;

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात