धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी पौळ (वय ३०) यांनी आपल्या तीन लहान मुलांसह किल्ल्याच्या उंच बुरुजावरून उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अश्विनी पौळ, त्यांचा साडेपाच वर्षीय मुलगा अजिंक्य आणि जुळ्या मुलींपैकी क्रांती यांचा मृत्यू झाला. तर दुसरी मुलगी वीरा गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Ashwini Pol
घटनेनंतर अश्विनी पौळ यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी त्यांच्या पती आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. कौटुंबिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी पौळ महाराष्ट्र सुरक्षा दलात कार्यरत होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांनी नोकरी सोडून मुलांसह माहेरी राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गुरुवारी नळदुर्ग किल्ल्यावर ही दुर्दैवी घटना घडली.
अश्विनी पौळ या राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू म्हणून प्रसिद्ध होत्या. कुस्तीच्या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावले होते. विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी ५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदके मिळवल्याचे सांगितले जाते. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य कुस्ती क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांना लहानपणापासूनच कुस्तीचे संस्कार मिळाले होते. त्यांच्या दमदार कामगिरीमुळे त्यांना ‘महाराष्ट्राची वाघीण’ अशी ओळख मिळाली होती.
घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
माहेरच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कौटुंबिक परिस्थितीसह घटनेमागील सर्व कारणांचा तपास केला जात आहे. राष्ट्रीय स्तरावरील गुणी कुस्तीपटू आणि तिच्या दोन चिमुकल्यांच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रासह धाराशिव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App