विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना घामाचा रास्त भाव मिळवून देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या ऊस आंदोलनाने आता अत्यंत रौद्ररूप धारण केले आहे. साखर कारखानदारांच्या नफेखोरीविरुद्ध आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारच्या भूमिकेविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. “साखर कारखानदार हेच सरकार आहेत आणि सरकार म्हणजेच कारखानदार आहेत! जर आमच्या शेतकऱ्यांच्या घरात यंदा गोड दिवाळी साजरी होणार नसेल, तर कारखानदारांचीही दिवाळी आम्ही होऊ देणार नाही,” असा सज्जड इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. raju shetty
इतकेच नव्हे, तर आंदोलनाची तीव्रता वाढवत उद्यापासून सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे आणि सीमाभागात शेतकऱ्यांच्या शेतातून एक कांदाही बाहेर पडू देणार नाही आणि रस्त्यावर उसाचे एकही वाहन फिरू देणार नाही, असा ‘चक्काजाम’ आदेशच त्यांनी बळीराजाला दिला आहे.
साखरेचा भाव ५,२०० रुपये, मग उसाला ४,५०० रुपये का नको?
साखर कारखानदारांच्या कथित सिंडिकेटचा पर्दाफाश करताना राजू शेट्टी यांनी साखरेच्या बाजारभावाचा आणि ऐतिहासिक ऊस दरांचा संपूर्ण ताळेबंद मांडला. “सध्या खुल्या बाजारात साखरेचे दर प्रतिक्विंटल सुमारे ५,२०० रुपयांवर पोहोचले आहेत. अशा स्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४,५०० रुपयांचा दर मागणे पूर्णपणे न्याय्य आणि कायदेशीर आहे.”
ऐतिहासिक दरांचा दाखला
“माझ्या २५ वर्षांच्या शेतकरी चळवळीत मी पाहिले आहे की, पहिल्या ऊस परिषदेत कारखानदार अवघा ४०७ रुपये दर देण्यास तयार होते; मात्र आंदोलनाच्या रेट्यानंतर आपण ७५० रुपये दर मिळवला, तेव्हा साखरेचा दर ८५० रुपये होता. पुढे जेव्हा साखरेचा दर १,६५० रुपये झाला, तेव्हा शेतकऱ्यांना १,५०० रुपये दर मिळाला. ३,२५० रुपये साखर दर असताना ३,००० रुपये ऊसदर मिळाला, तर मागील वर्षी ३,७०० रुपये साखर असताना शेतकऱ्यांनी ३,५०० रुपयांचा दर पदरात पाडून घेतला.”
१५० ते २०० रुपयांचा फरक शक्य
“ज्या साखर कारखान्यांचा साखर उतारा १२ ते १३ टक्के आहे, त्यांच्या बाबतीत साखरेच्या विक्रीदरापेक्षा केवळ १५० ते २०० रुपये कमी दराने ऊसदर निश्चित होणे सहज शक्य आहे. त्यामुळे आजच्या ५,२०० रुपयांच्या भावानुसार शेतकऱ्यांना अधिक मोबदला का दिला जात नाही?” असा जाब त्यांनी विचारला.
प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे उद्योगपतींच्या दावणीला बांधली गेली आहे, याचा संतापजनक पुरावा राजू शेट्टी यांनी जाहीर सभेत मांडला. “दोन महिन्यांपूर्वी मी विट्यापासून अवघ्या ५ ते ६ किलोमीटर अंतरावरील भाग्यनगर गावात गेलो होतो. नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी एका बड्या उद्योगपतीला तिथली जमीन हडप करायची होती. त्यासाठी मध्यरात्री ३:३० वाजता तब्बल ४०० पोलिसांचा ताफा, ३ उपजिल्हाधिकारी, ४ तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी आणि मोजणी विभागाचे कर्मचारी गावात घुसले!”
शेतकऱ्यांच्या चोरीची साधी दखल नाही
“दुसऱ्या बाजूला त्याच भागातील गरीब शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या केबल चोरीला गेल्या. शेतकऱ्यांनी विटा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करून १५ दिवस उलटले, तरी पोलिसांना घटनास्थळाची पाहणी करायला वेळ मिळाला नाही. उद्योगपतींच्या लाभासाठी प्रशासन मध्यरात्री पळते, पण अन्नदात्या शेतकऱ्याला साध्या सातबाऱ्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात; मग शेतकऱ्यांच्या संयमाचा उद्रेक होणार नाही तर काय होणार?” असा सवाल त्यांनी केला.
कांदा आणि उसाची वाहतूक १००% ठप्प करा
सरकार आणि साखर सम्राटांची कोंडी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची रणनीती अधिक आक्रमक केली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि सीमेलगतच्या कर्नाटकातील शेतकऱ्यांना आवाहन करताना शेट्टी म्हणाले, “उद्यापासून एकाही शेतकऱ्याने आपला ऊस कारखान्याला पाठवायचा नाही आणि कांदाही बाजारात आणायचा नाही. सर्व वाहतूक जागीच रोखा.”
दुसऱ्या टप्प्यात दूध आणि भाजीपाला बंद
“पहिल्या टप्प्यात ऊस आणि कांद्याची कोंडी केली जाईल. कारखानदारांनी आणि शासनाने जर तरीही नमते घेतले नाही, तर पुढील टप्प्यात संपूर्ण शहरांचा दूध पुरवठा आणि भाजीपाला बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल.”
गावोगावी आंदोलकांना अन्न-पाणी
रस्त्यावर ठाण मांडून बसणाऱ्या शेतकऱ्यांना कोणीही उपाशी ठेवू नये. गावागावांतील गावकऱ्यांनी आंदोलक शेतकऱ्यांसाठी भाकरी, चहा, नाश्ता आणि पाण्याची सोय करावी, असे आवाहन त्यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App