विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: देशाच्या राजकीय पटलावर सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा समोरासमोर थेट चर्चेचे खुले आव्हान दिले आहे. मंगळवारी सोशल मीडियावर जारी केलेल्या 1.50 मिनिटांच्या एका आक्रमक व्हिडीओ संदेशात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा साधला. “मोदीजी, आव्हान देऊन आता 24 तास उलटून गेले आहेत. तुम्ही विरोधकांना देशद्रोही ठरवता, मग समोरासमोर या; चर्चेचे व्यासपीठ, जागा आणि मध्यस्थी करणारे न्यायाधीशही तुम्हीच निवडा. देशद्रोही कोण आहे आणि परकीय शक्तींशी कोणाचे लागेबांधे आहेत, यावर देशासमोर एकदाची खुली चर्चा होऊनच जाऊ द्या, घाबरू नका,” असा थेट वार राहुल गांधींनी केला.
राहुल गांधींच्या या आक्रमक आव्हानाला छत्तीसगडमधील नवा रायपूर येथून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने प्रत्युत्तर दिले. “नरेंद्र मोदी सरकार प्रत्येक विषयावर चर्चेसाठी १००% तयार आहे; आधी संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्या. बनावट संसद भरवून नौटंकी करण्यापेक्षा हिंमत असेल तर संसदेत देशाच्या जनतेसमोर चर्चा करून दाखवा,” असा पलटवार अमित शाह यांनी केला.
अमेरिकेशी गुप्त करार, अदानी प्रकरण ते एपस्टीन फाइल्स
आपल्या व्हिडीओ संदेशात राहुल गांधी यांनी आर्थिक धोरणे, आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि उद्योगपतींशी असलेल्या कथित संबंधांवरून पंतप्रधान मोदींवर प्रश्नांची सरबत्ती केली. “देशद्रोही नेमके कोण आहेत? परकीय शक्तींशी कोणाचे संबंध आहेत आणि ते कोणत्या स्वरूपाचे आहेत? यावर जाहीर चर्चा झालीच पाहिजे. लवकरात लवकर वेळ ठरवा, मागे हटू नका.”
मंत्रिमंडळाला न सांगता करार का केले?
“देशाच्या आर्थिक संरचनेवर आणि व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जातील. अमेरिकेसोबतचा वादग्रस्त करार कसा झाला? एवढ्या घाईघाईत हा करार का करण्यात आला? हा निर्णय कॅबिनेटला अंधारात ठेवून केवळ तुम्ही एकट्यांनीच का घेतला? अदानींचे प्रकरण का बंद करण्यात आले? आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या एपस्टीन फाइल्स प्रकरणाचे धागेदोरे काय आहेत? अशा अनेक संवेदनशील बाबींवर देशासमोर खुलेपणाने चर्चा होईल. या, घाबरू नका.”
परदेशी संबंधांवर मानहानीचा खटला का नाही?
“इतर किरकोळ मुद्द्यांवर माझ्यावर देशभरात तब्बल 45 मानहानीचे खटले दाखल करण्यात आले आहेत. मात्र जेव्हा परदेशी हितसंबंधांचा प्रश्न येतो, तेव्हा तुम्ही मानहानीचा खटला दाखल करण्याचे धाडस का दाखवत नाही? माझ्यावर या मुद्द्यावरही खटला दाखल करा, न्यायालयातही आपण खुलेपणाने चर्चा करू. शेवटी मोदीजी, तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा!” असा टोलाही त्यांनी लगावला.
बनावट संसद भरवून खऱ्या संसदेची थट्टा उडवली
राहुल गांधींच्या विधानांवर छत्तीसगडच्या दौऱ्यावर असताना गृहमंत्री अमित शाह यांनी सडेतोड उत्तर दिले. “नरेंद्र मोदींचे सरकार विरोधकांच्या कोणत्याही प्रश्नापासून पळ काढत नाही. आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहोत, मात्र विरोधकांनी संसदेचे कामकाज चालू दिले पाहिजे. विरोधकांच्या मागणीनुसार आम्ही संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून मतदार यादी पुनरीक्षण (SIR), ईव्हीएम किंवा इतर कोणत्याही विषयावर चर्चा घडवून आणण्यास तयार आहोत.”
बनावट संसदेवरून टोला
“दिल्लीत बनावट संसद उभी करून विरोधकांनी देशाच्या लोकशाहीची आणि खऱ्या संसदेची क्रूर खिल्ली उडवली आहे. तिथे चर्चेचे केवळ नाटक करण्यात आले. केवळ हातात संविधानाचे पुस्तक घेऊन फिरल्याने संविधानाचे रक्षण होत नाही; तुमचे आचरण संविधानाला साजेसे असले पाहिजे. जर हिंमत असेल, तर रस्त्यावर अराजकता पसरवण्याऐवजी संसदेच्या पटलावर जनतेच्या साक्षीने चर्चा करून दाखवा.”
सध्या सुरू असलेल्या या राजकीय वादावरून आगामी संसद अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड खडाजंगी होण्याची चिन्हे असून, राष्ट्रीय सुरक्षेपासून ते परकीय संबंधांपर्यंतचे सर्व मुद्दे आता ऐरणीवर आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App