आधुनिक तंत्रज्ञानाच्या गुन्हे नियंत्रणासाठी पोलीस दलाने सज्ज व्हावे-मुख्यमंत्री
सक्षम युवा पिढी घडविण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत सहभागी होण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
विशेष प्रतिनिधी
पुणे : आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक उपक्रम आणि वेगवान तपासाच्या माध्यमातून गुन्हे नियंत्रणात पिंपरी चिंचवड पोलीस दलाने चांगली कामगिरी केली आहे. येत्या काळात पिंपरी चिंचवडचा विस्तार पुण्यापेक्षा अधिक होणार असल्याने पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रभावीपणे गुन्हे नियंत्रण करीत या आव्हानाला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. युवाशक्तीला दिशा आणि शक्ती देण्यासाठी घर, परिसर, गाव, जिल्हा आणि महाराष्ट्र अंमली पदार्थमुक्त करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. Pimpri Chinchwad Police Commissionerate
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ व लोकार्पण आज करण्यात आले. त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, गृह राज्यमंत्री योगेश कदम, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशात अंमली पदार्थाचे मोठे आव्हान आहे. युवा पिढीची क्षमता कमी करण्यासाठी आणि परिणामत: देशाची प्रगती रोखण्यासाठी देशात अंमली पदार्थ पाठविले जातात. याला पूर्णत: प्रतिबंध घालण्यासाठी पुढील 3 ते 4 वर्षात देश अंमली पदार्थमुक्त करण्याचा निर्धार शासनाने केला असून त्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करायचे आहे. देशाच्या निर्मितीत महत्वाचे योगदान असलेल्या, नवोपक्रमात पुढे असलेल्या युवा पिढीला अंमली पदार्थांपासून वाचविण्यासाठी प्रत्येकाला या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत सहभाग घ्यावा लागेल.
राज्य शासन विविध पातळ्यांवर या दिशेने काम करीत आहे व्यसनाधीन व्यक्तींवर उपचार, लोकजागृती, अंमली पदार्थांच्या निर्मितीवर नियंत्रण आणणे, वितरण साखळी मोडीत काढणे अशा विविध जबाबदाऱ्या संबंधित यंत्रणांवर सोपविण्यात आल्या आहेत. पालकांनीदेखील व्यसनाधीन पाल्याचे समुपदेशन करण्यासोबत त्यावर योग्य उपचार वेळीच करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
पोलिसांना अत्याधुनिक सुविधा देण्यावर भर
मुख्यमंत्री म्हणाले, पिंपरी चिंचवडसाठी अत्यंत आधुनिक असे पोलीस मुख्यालय तयार करण्यात येत आहे. पोलीस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीची रचना दिवंगत अजित पवार यांनी स्वत: लक्ष घालून तयार करून घेतली आहे. आयुक्तालयाची इमारत तयार झाल्यावर ते देशातील सर्वात आधुनिक पोलीस आयुक्तालय असेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
पोलीस मुख्यालयासाठी देखील 50 एकर जागा देण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांसाठी आधुनिक स्वरुपाची निवासस्थाने उभारण्यात येत आहेत. पोलिसांसाठीच्या निवासस्थानाचा पारंपरिक आराखडा बदलून सर्व सोईयुक्त निवासस्थाने पोलिसांना देण्यात येत आहेत. पोलीस कुटुंबांना सन्मानाने जगता यावे यासाठी चांगल्या घरांची निर्मिती तयार करण्यात येत आहे, असे श्री.फडणवीस यांनी सांगितले.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक
शहर सुरक्षित ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान गरजेचे आहे. डायल 112 मुळे प्रतिसादाची वेळ 3 मिनीटावर आली आहे आणि पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालय याबाबतीत राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. गुन्हे घडताना तात्काळ प्रतिसाद देऊन पोलीस कारवाई करताना दिसत आहेत. याची डिजीटल माहिती उपलब्ध होत आहे. गुन्हेगारांवर यामुळे वचक बसतांना दिसत आहे. रस्त्यावरील गुन्हे पूर्णत:नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढते आहे. सीसीटीव्ही नेटवर्कच्या माध्यमातून वाहतूक, गुन्हे नियंत्रणाचे काम शक्य होत आहे. एआय तंत्रज्ञानाद्वारे मानवी मर्यादांवर मात करून गुन्ह्यांचा तपास करता येतो. एआय आधारित ‘तपास सारथी’मुळे तपास सुरू झाल्यापासून न्यायालयात जाईपर्यंत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे तपास व आरोपपत्र तयार करण्याचे काम होत आहे. यामुळे गुन्हे नियंत्रणात निश्चितपणे उपयोग होणार आहे.
पोलीस दलदेखील नवे तंत्रज्ञान आत्मसात करताना दिसत आहेत. बॉडीवॉर्न कॅमेऱ्यामुळे कमांड ॲण्ड कन्ट्रोल सिस्टीमलादेखील गुन्हे तपासाची माहिती मिळण्यासोबत पोलीसांना सुरक्षितता मिळणार आहे. वाहतूकीच्या तक्रारीदेखील यामुळे येत्या काळात कमी होतील. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने अत्यंत कमी कालावधीत चांगली प्रगती केल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. पुढील 15 वर्षात पिंपरी चिंचवड परिसरात पुण्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणार असल्याने पोलीस दलाने त्यादृष्टीने सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App