विशेष प्रतिनिधी
पुणे : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बाजारपेठांमध्ये मिठाई, फराळ आणि सुकामेव्याच्या खरेदीला वेग आला आहे. मात्र, सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कडक पावले उचलली आहेत. राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांना कडक इशारा देत दिवाळीच्या फराळात भेसळ किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ आढळल्यास नागरिकांनी तातडीने एफडीएच्या अधिकृत पोर्टलवर तक्रार दाखल करावी, असे आवाहन केले आहे. FDA Watch
पुण्यातील द पूना मर्चंट्स चेंबरच्या वतीने आयोजित पारंपरिक लाडू-चिवडा विक्री उपक्रमाचे उद्घाटन मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर राबवण्यात येत असलेल्या विशेष अन्नसुरक्षा तपासणी मोहिमेची माहिती दिली.
सणाच्या काळात ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांवर प्रशासनाची करडी नजर असून, अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने चार टप्प्यांमध्ये विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम सणाच्या २१ दिवस आधीपासून सुरू करण्यात आली असून सण संपल्यानंतर पुढील ३० दिवसांपर्यंत सुरू राहणार आहे.
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात अन्नपदार्थ उत्पादक, गोदामे, वितरक आणि उपवितरक यांची तपासणी करण्यात येत आहे. बाजारपेठेत निकृष्ट दर्जाचा किंवा भेसळयुक्त कच्चा माल पोहोचू नये, हा या कारवाईमागील मुख्य उद्देश असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
दुसऱ्या टप्प्यात किरकोळ विक्रेत्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दिवाळीचे लाडू, चिवडा, चकली, करंजी आणि इतर फराळाचे पदार्थ सणाच्या आठ ते पंधरा दिवस आधीच तयार केले जात असल्याने या काळात तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे.
दिवाळीनिमित्त मिठाई आणि फराळाची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याने अन्न व औषध प्रशासनाने मिठाईची दुकाने, सुकामेवा विक्रेते, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादक, खाद्यतेल विक्रेते तसेच मसाल्यांच्या व्यवसायावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.अन्नपदार्थ तयार करताना स्वच्छता, योग्य साठवणूक आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी केली जात आहे.
विशेषतः खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंगांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुंढे यांनी व्यावसायिकांना केले.सणासुदीच्या काळात नागरिकांनीही अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत सतर्क राहण्याची गरज असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
मिठाई, फराळ किंवा इतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय आल्यास नागरिकांनी एफडीएच्या अधिकृत पोर्टलवर तक्रार दाखल करावी. प्राप्त तक्रारींच्या आधारे संबंधित प्रकरणांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर उत्पादक आणि विक्रेत्यांनी प्रशासनाने निश्चित केलेले अन्नसुरक्षेचे नियम आणि सणासुदीच्या काळात जारी करण्यात आलेल्या अनुपालन आदेशांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.नियमांचे पालन केल्यास व्यवसायाचा दर्जा टिकून राहील आणि ग्राहकांना दूषित किंवा भेसळयुक्त अन्नामुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळेल, असे मुंढे यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, द पूना मर्चंट्स चेंबरच्या लाडू-चिवडा विक्री उपक्रमाचे उद्घाटन करण्यापूर्वी संबंधित खाद्यपदार्थांची एफडीएकडून गुणवत्ता तपासणी करण्यात आल्याची माहिती मुंढे यांनी दिली.गुणवत्तेसंबंधी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची प्रशासनाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.
दिवाळीच्या बाजारपेठांवर प्रशासनाची करडी नजर
दिवाळीच्या खरेदीमुळे पुण्यासह राज्यभरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत आहे. मिठाई, फराळ, सुकामेवा आणि इतर खाद्यपदार्थांच्या मागणीत वाढ होत असल्याने उत्पादक आणि विक्रेत्यांकडून अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.
अन्न व औषध प्रशासनाची तपासणी मोहीम सणानंतरही सुरू राहणार असल्याने उत्पादक, घाऊक व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांवर प्रशासनाची नजर कायम राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App